अतिवृष्टीने मुंबई कोलमडली!

अतिवृष्टीने मुंबई कोलमडली!

Published on

अतिवृष्टीने मुंबई कोलमडली!
मिठीचे पुन्हा रौद्ररूप, रेल्वे ठप्प
अनेक भाग जलमय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुंबईला सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा फटका बसला. हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने सकाळी समुद्राला मोठी भरती होती. त्यात वादळ-वाऱ्यासह जोरदार पाऊस. यामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. त्यात अनेक गाड्या अडकून पडल्‍या.
रेल्वे रुळांवर पाणी भरल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वे विलंबाने सुरू होती. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तिला रौद्ररूप रूप आले. नदीलगतच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी दिली होती. मुसळधार पावसामुळे मुंबई आज कोलमडल्याचे दिसून आले.
मुंबई शहर आणि उपनगरांत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आजही मुंबईला झोडपून काढले. आज सकाळी नऊ वाजून १६ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती होती. वादळी वाऱ्यासह समुद्र खवळला होता. त्यात मुसळधार पाऊस, यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांचे सखल भाग जलमय झाले. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी तीन-चार फूट पाणी भरले होते. रस्त्यात अनेक वाहने अडकून पडली.

महामार्गावर वाहतूक कोंडी
पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर आजही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. पूर्व द्रुतगती महामार्गांवर काही ठिकाणी पाणी भरले होते. त्यामुळे त्याचा फटका बसला.

रेल्वे रुळांना नदीचे स्वरूप
कुर्ला, चुनाभट्टी, सायन, दादर या रेल्वेस्थानकांजवळील रेल्वे ट्रॅकवर पाणी भरले होते. सकाळी काही प्रमाणात लोकल सेवा विलंबाने धावत होती, मात्र पावसाचा जोर वाढला आणि ट्रॅकवर पाणी भरण्यास सुरुवात झाली तेव्हा मध्य आणि हार्बर सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. काही ठिकाणी रेल्वे रुळांना नदीचे स्वरूप आल्यासारखे दिसत होते.

मिठी झाली रौद्र
अतिवृष्टीमुळे मिठी नदीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याचा इशारा दिला होता. दुपारी मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर तेथील नागरिकांना स्थलांतरित केले.

पाणी भरले
मुंबईच्या शहर आणि उपनगरांच्या सखल भागांत पाणी भरले. घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, वडाळा, हिंदमाता, सायन सर्कल, चेंबूर पोस्टल कॉलनी, वडाळा, चुनाभट्टी, सायन किंग सर्कल, माटुंगा, गोवंडी, मानखुर्द, अंधेरी डी. एन. नगर, अंधेरी सबवे, जेपी रोड, कुर्ला एलबीएस मार्ग, जोगेश्वरी वीरा देसाई रोड, गोरेगाव, मालाड, विद्याविहार, कांजूरमार्ग, भांडुप, भायखळा, वर्सोवा, वरळी, सांताक्रूझ या सखल भागांत पाणी भरले.

प्रवासांची रुळावरून पायपीट
ठिकठिकाणी रेल्वे खोळंबल्याने अडकलेल्या प्रवाशांनी खाली उतरून ट्रॅकमध्ये भरलेल्या पाण्यातून वाट काढत सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला.

समुद्रही खवळला
मुंबईच्या समुद्राला सकाळी नऊ वाजून १६ मिनिटांनी भरती सुरू झाली. मुंबईच्या समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्‍या. जोरदार वादळ वारे वाहू लागल्याने समुद्र खवळला होता.


कार्यालयांना सुट्टी
मुंबईतील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, खासगी कार्यालयांना सुट्टी द्यावी किंवा वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा द्यावी, अशा सूचना मुंबई महापालिकेने केल्या.

पालिकेचे कर्मचारी तैनात
मुंबई महापालिकेने अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन मुंबईत २४ विभागांमध्ये भरतीच्या ठिकाणाजवळ कर्मचारी तैनात करण्यात आले. ते मॅनहोलजवळ भरलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करीत परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत.

अडीचनंतर पाण्याचा निचरा
पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी पुरेसे पंप लावण्यात आले. अनेक ठिकाणी मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान. पावसाची संततधार सुरू असल्याने तसेच समुद्राला मोठे भरती असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास समुद्राला ओहोटी सुरू झाल्याने मुंबईत भरलेल्या पाण्याचा हळूहळू निचरा होऊ लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com