पावसामुळे रेल्वे वाहतूक थांबली
पावसामुळे रेल्वे वाहतूक थांबली
शेकडो लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाने मंगळवारी अक्षरशः थैमान घातले. रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले तसेच रेल्वे वाहतुकीवरही त्याचा मोठा परिणाम झाला. सकाळपासूनच लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. परंतु साडेअकरानंतर परिस्थिती पूर्णपणे बिघडली आणि अर्ध्या तासातच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते कुर्ला हार्बर मार्गांदरम्यानची सेवा बंद करण्यात आली. हार्बर मार्गावरील चुनाभट्टी-कुर्लादरम्यान तब्बल १९ इंच पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अनपेक्षित निर्णयामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दिवसभर शेकडो लोकल फेऱ्या रद्द झाल्या, तर अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्याही रद्द कराव्या लागल्या.
प्रवाशांचे हाल
सकाळी ११.२० वाजता हार्बर मार्गावर चुनाभट्टी-कुर्लादरम्यान पाणी आल्याने प्रथम या मार्गावरील सेवा थांबली. अवघ्या पाच मिनिटांत म्हणजे ११.२५ वाजता कुर्ला-सायनदरम्यान जलद मार्गावरील रूळ पाण्याखाली गेले आणि सेवा बंद झाली. पुढे ११.४५ वाजता धीम्या मार्गावरील वाहतूकही थांबवावी लागली. त्यामुळे हजारो प्रवासी विविध स्थानकांवर अडकले. लोकल जागीच थांबल्याने प्रवाशांना पायी चालत जवळचे स्थानक गाठावे लागले. अनेक ठिकाणी महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवासी रुळांवरून पायपीट करीत सुरक्षित ठिकाणी जाताना दिसले. मुसळधार पाऊस, पाण्याने भरलेला रस्ता आणि गर्दी यामुळे प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. काही ठिकाणी तर प्रवाशांनी रिक्षा, बेस्ट बस किंवा खासगी वाहनांचा आधार घेतला, परंतु रस्त्यावर पाणी असल्याने त्यातही मोठी अडचण आली.
पश्चिम रेल्वेवरील परिणाम
पश्चिम रेल्वेवरील सेवा सुरू असली तरी लोकल गाड्या अत्यंत संथ गतीने धावत होत्या. दुपारी १२ वाजल्यानंतर वसई-विरार मार्गावरील वाहतूक कोलमडली. प्रवाशांनी सोशल मीडियावर प्रत्यक्ष अनुभव शेअर करून विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाने नियंत्रण कक्षातून व्हिडिओ प्रसिद्ध करून सेवा सुरू असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना दीड ते दोन तासांचा विलंब सहन करावा लागत होता.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
पावसाचा मोठा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला. काही गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे बदलावे लागले. पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावल्या. काही गाड्या मध्यंतरी थांबवून ठेवाव्या लागल्या. मुख्य मार्गावरील सायन-कुर्ला दरम्यान ११ इंच पाणी साचले होते. नियमांनुसार स्थानिक गाड्यांसाठी सहा इंच आणि मेल-एक्स्प्रेससाठी चार इंच इतकीच परवानगी असते. त्यापेक्षा जास्त पाणी असल्याने प्रवासी आणि रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक थांबवावी लागली. त्यामुळे दुपारपासून संध्याकाळपर्यंत मेल-एक्स्प्रेस प्रवाशांना लांब प्रतीक्षा करावी लागली.
सुट्टी व वर्क फ्रॉम होम
राज्य सरकारने मुसळधार पावसाचा अंदाज पाहता मंगळवारी शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले नाही. कार्यालयीन कामासाठीही अनेकांनी घरून काम करण्याचा पर्याय निवडला. सोमवारी झालेल्या पावसामुळे आधीच प्रवाशांनी हाल सोसले होते. त्यामुळे मंगळवारी अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. तथापि, ज्या प्रवाशांना नाइलाजास्तव बाहेर पडावे लागले त्यांना दिवसाचा अधिक वेळ रेल्वेस्थानकांवरच घालवावा लागला.
मदत केंद्रे व पालिकेची तयारी
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी, ठाणे, कल्याण, पनवेल, वडाळा, कुर्ला, दादर व वाशी स्थानकांवर मदत केंद्रे सुरू केली. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे केंद्रे कार्यान्वित केली. या केंद्रांवर पाणी, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन माहिती उपलब्ध करून देण्यात आली. तसेच एफ उत्तर विभागाने दादर, माटुंगा, सायन, वडाळा, जीटीबी आणि चुनाभट्टी या स्थानकांवर पालिकेचे कर्मचारी तैनात केले. पाणी उपसण्यासाठी पम्पिंग मशीन कार्यान्वित करण्यात आल्या. नागरिकांना सुरक्षिततेसाठी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले.
अशी कोलमडली लाइफलाइन...
- पहाटेपासून संथ गतीने धावणाऱ्या लोकल सकाळी ११.२० वाजता हार्बर मार्ग बंद
- ११.२५ वाजता कुर्ला-सायनदरम्यान जलद मार्ग बंद
- ११.४५ वाजता सीएसएमटी-ठाणे धीम्या मार्गाची सेवा बंद
- दुपारी १२ वाजता वसई-विरार वाहतूक ठप्प
रुळांवर पाणी
- सायन-कुर्लादरम्यान ११ इंच पाणी
- हार्बर लाईनवरील कुर्ला-चुनाभट्टी येथे तब्बल १९ इंच पाणी
- लोकलसाठी परवानगी : ६ इंच
- मेल-एक्स्प्रेससाठी परवानगी : ४ इंच
या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द
मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या तसेच मुंबईकडे येणाऱ्या एकूण १४ मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. यात पुणे–मुंबई मार्गावरील ११००७, ११००८ डेक्कन क्वीन, १२१२७, १२१२८ विदर्भ एक्स्प्रेस, २२१०५, २२१०६ इंदौर–पुणे एक्स्प्रेस, १२१२५, १२१२६ प्रयागराज एक्सप्रेस आणि १२१२३, १२१२४ पुणे–सीएसएमटी एक्स्प्रेस या १० गाड्या समाविष्ट आहेत. तसेच ११०११, ११०१२ धुळे–सीएसएमटी एक्स्प्रेस आणि २०७०५, २०७०६ जळना–सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस या चार गाड्याही रद्द झाल्या आहेत.
सकाळी कामाला जाण्यासाठी सीएसएमटीच्या लोकलमध्ये बसलो होतो; पण कुर्ल्याजवळ लोकल थांबली आणि दोन तासांपेक्षा जास्त वेळ हललीच नाही. आतमध्ये घुसमट सुरू झाली होती. शेवटी आम्ही रुळांवरून चालत नजीकचे स्थानक गाठले. पावसामुळे आमचे मोठे हाल झाले.
- पंकज कुमार, प्रवासी, ठाणे
मी रोज लोकलने सीएसएमटीपर्यंत प्रवास करतो. आज सकाळपासून ट्रेन उशिरा येत होत्या. शेवटी हार्बर मार्ग बंद झाला तेव्हा ऑफिसला पोहोचणे अशक्य झाले. घरून काम करण्याचा पर्याय होता, पण सर्वांना ते शक्य होत नाही. प्रवासात तासन्तास अडकून राहणे म्हणजे मानसिक ताणच आहे.
- वीरेंद्र दिनकर हिंडे, बेलापूर
मला आज दादरला खासगी कामासाठी जायचं होतं. पण रेल्वे बंद झाल्यामुळे संपूर्ण दिवस वाया गेला. रिक्षा किंवा टॅक्सी मिळाली तरी रस्ते पाण्याखाली असल्याने प्रवास करणे कठीण झाले. मुंबईसारख्या महानगरात साध्या कामासाठी बाहेर पडायलाही एवढे हाल होणे खरंच त्रासदायक आहे.
- निखिल कुमार, घाटकोपर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.