ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस

ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस

Published on

ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, गेल्या ५८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचे प्रमाण ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा प्रचंड वाढले आहे. हे प्रमाण ४४ ते ८८ टक्के जास्त असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
कुलाबा वेधशाळेत ऑगस्ट महिन्याची सरासरी पावसाची नोंद ४८२ मिमी आहे, परंतु १७ ते १९ ऑगस्ट या कालावधीत २१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही सरासरीच्या पावसाच्या ४४ टक्के इतकी जास्त आहे. त्याचप्रमाणे सांताक्रूझ वेधशाळेवर ऑगस्ट महिन्याची सरासरी ५६६.४ मिमी नोंदवली असून, गेल्या ५८ तासांत ५०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे, म्हणजे सरासरीपेक्षा ८८ टक्के जास्त आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार शहरातील पूर्व व पश्चिम उपनगरांमध्येही पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्व उपनगरांत १०८.८१ मिमी, तर पश्चिम उपनगरांत ११५.९२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे दादर वर्कशॉपमध्ये १२७ मिमी, अंधेरीतील टागोरनगर पालिका शाळेत १९० मिमी, विक्रोळी अग्रिशमन केंद्र १६७ मिमी, मालपा डोंगरी १७८ मिमी इतका पाऊस झाला. या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले. रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.
महापालिकेने पाणी साचलेल्या भागांमध्ये तातडीने ५२५ पंप तैनात करून निचरा सुरू केला. मिठी नदीच्या पातळीमुळे कुर्ला क्रांतीनगर येथील ३५० नागरिकांना स्थलांतरित केले, तर सूर्यानगर, विक्रोळी, खिंडीपाडा व भांडुपमधील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी रहिवाशांसाठी तात्पुरती निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत पुढील २४ तासांतही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, ४५ ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com