महाराष्ट्रासह नेपाळमध्येही मतदान
महाराष्ट्रासह नेपाळमध्येही मतदान
तीन दशके नवी मुंबईत बेकायदा वास्तव्य; दाम्पत्यास अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः गेली तीन दशके नवी मुंबईक बेकायदा राहणाऱ्या नेपाळी कुटुंबाने मतदार ओळखपत्राआधारे महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर झालेल्या चौकशीतून उजेडात आला. विशेष म्हणजे या कुटुंबाने नेपाळमध्येही मतदानाचा हक्क बजावला.
मूळ नेपाळचे नागरिक असलेले नेनसिंग बिश्त (वय ६१) आणि पर्बतीदेवी (५८) १९९५ मध्ये भारतात आले आणि येथेच स्थायिक झाले. सध्या ते कामोठे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांचा एक मुलगा येथे एमबीए शिकून नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात आहे, तर दुसरा मुलगा आणि सून घणसोलीत राहतात. नेपाळी नागरिकांना भारतात येण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नसते; मात्र सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करायचे असल्यास परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला कळवावे लागते, त्यांची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाली तरी नेपाळच्या किंवा अन्य कोणत्याही देशातील नागरिकांना आधार कार्ड, शिधापत्रिका, पारपत्र, मतदार ओळखपत्र मिळवता येत नाही; मात्र बिश्त यांच्याकडे नेपाळचा पासपोर्ट आहे. तसेच नवी मुंबई महापालिका हद्दीतील शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्डही आहे. २०१४ मध्ये त्यांनी कामोठ्यात स्वतःचे घर घेतले. त्याआधारे त्यांनी मतदार ओळखपत्र मिळवत २०१९ आणि २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानही केले. धक्कादायक बाब म्हणजे गेली तीन दशके भारतात वास्तव्य करूनही या कुटुंबाने नेपाळला जाऊन तेथील प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे.
----
कसा झाला भांडाफोड?
बिश्त दाम्पत्य गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला मुलाकडे गेले होते. सोमवारी (ता. १८) रात्री ते मुंबईत परतले. नेपाळच्या पासपोर्टवर प्रवास करणाऱ्या या दाम्पत्याची विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आम्ही मित्राला भेटण्यासाठी मुंबईत उतरल्याचे सांगितल्यावर इमिग्रेशन अधिकारी गणेश गवळी यांनी मित्राचे आधार कार्ड मागवले. ते मित्राचे नसून घणसोलीतील त्यांच्या मोठ्या मुलाचे होते. त्यामुळे या दाम्पत्यावरील संशय बळावला.
----
हक्क नसताना मतदान
सखोल चौकशीत परदेशी नागरिक प्रादेशिक नोंदणी कार्यालयास न कळवता, परवानगी न घेता हे कुटुंब तीन दशके भारतात वास्तव्यास होते. शिवाय त्यांनी मतदार ओळखपत्र मिळवून मतदानाचा हक्क नसताना तो बजावल्याचे स्पष्ट झाले.
----
ओळखपत्रे रद्द करण्याची विनंती
शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवत बिश्त दाम्पत्यास अटक केली. गुन्ह्याचा तपास करताना त्यांच्या आणि कुटुंबातील अन्य सदस्यांची मतदार ओळखपत्रे रद्द करण्याच्या दृष्टीने उचित कारवाई करावी, अशी विनंती इमिग्रेशन विभागाने पोलिसांना केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.