सायबर भामट्यांना बँक खात्यांची रसद पुरवणारी टोळी अटकेत

सायबर भामट्यांना बँक खात्यांची रसद पुरवणारी टोळी अटकेत

Published on

सायबर भामट्यांना बँक खात्यांची रसद पुरवणारी टोळी अटकेत
- गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई, ता. २३ : सायबर भामट्यांना गुन्ह्यांसाठी आवश्यक बँक खात्यांची रसद पुरविणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. या टोळीने पुरवलेल्या १८१ बँक खात्यांच्या माहितीच्या जोरावर सायबर भामट्यांनी देशभरात ६० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी १.६२ कोटी मुंबईतून तर १०.५७ कोटी उर्वरित महाराष्ट्रातून परस्पर चोरण्यात आले आहेत.
गुन्हे शाखेच्या सात रस्ता कक्षाने कांदिवली पूर्वेकडील डी. एस. कन्सल्टन्सी आणि पश्चिमेकडील प्रेरित लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांच्या कार्यालयांवर छापा घालून एका महिलेसह पाच जणांना अटक केली. दोन्ही ठिकाणी हाती लागलेल्या लॅपटॉप, हार्ड डिस्कच्या तपासणीतून ९४३ बचत आणि चालू बँक खाती या टोळीने सायबर भामट्यांना उपलब्ध करून दिल्याचा संशय निर्माण करणारी माहिती पुढे आल्याचे गुन्हे शाखेचे उपआयुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले.
टोळीने उपलब्ध करून दिलेल्या ९४३ पैकी १८१ खात्यांचा वापर भामट्यांनी फसवणुकीसाठी केला. देशभरात दाखल ३३९ तक्रारींमध्ये या बँक खात्यांचा सहभाग आहे. त्याआधारे मुंबईत १४, उर्वरित महाराष्ट्रात १२ आणि देशभरात (महाराष्ट्र वगळून) ३३ गुन्हे नोंद आहेत.

आठ हजार रुपयांत खाते
गुन्हे शाखेने अटक केलेले वैभव पटेल, सुनीलकुमार पासवान, अमनकुमार गौतम, खुशबू संदराजुळा आणि रितेश बांदेकर या आरोपींनी गरीब, गरजू व्यक्तींच्या नावे, बँक खाती सुरू करून घेतली. प्रत्येकी सात ते आठ हजार रुपये देत या सर्व खात्यांचा ताबा टोळीने स्वतःकडे घेतला. पुढे खातेदारांच्या नावे बोगस कागदपत्रांद्वारे सिम कार्ड मिळवली. ती या खात्यांना जोडून सायबर भामट्यांना पुरवली.

Marathi News Esakal
www.esakal.com