घराघरांत ताप सर्वेक्षण, थेट आरोग्य केंद्रात संपर्काचे आवाहन
घराघरांत ताप सर्वेक्षण, थेट आरोग्य केंद्रात संपर्काचे आवाहन
गणेशोत्सवाआधी महापालिकेची कारवाई; मंडपांमध्ये धूरफवारणी व शून्य डास मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी महापालिकेमार्फत नियमित प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. विशेषतः गणेशोत्सव जवळ आल्याने मंडळांच्या परिसरात धूरफवारणीसह डास निर्मूलनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मे २०२५ पासून लवकर सुरू झालेल्या पावसामुळे हिवताप (मलेरिया) आणि चिकुनगुनिया रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असली तरी लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्या घटल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार यावर्षी जगभर डेंगी व चिकुनगुनियामध्ये वाढ नोंदली गेली असून, मुंबईतही याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत पावसाळी आजाराविरोधात अधिक प्रभावी कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ‘शून्य डास’ मोहीम रुग्णालये, शाळा व कार्यालयांमध्ये दर शनिवारी राबवली जात आहे. पाणी साठू नये, यासाठी टाकाऊ साहित्य काढणे, पाणी गळती थांबवणे व स्वच्छता यावर भर दिला जात आहे. तसेच घराघरांत जाऊन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण, लेप्टोविरोधी औषधोपचार व नागरिकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे.
गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन जनजागृती केली जात असून, धूरफवारणीद्वारे डास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. खासगी डॉक्टरांना मलेरियासाठी समूळ उपचार देण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले आहे.
घराभोवती पाणी साचू देऊ नये, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात, जुने टायर व प्लॅस्टिक कंटेनरची विल्हेवाट लावावी, मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. पाणी उकळून प्यावे, रस्त्यावरचे अन्न टाळावे आणि ताप आल्यास त्वरित महापालिकेच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या सहकार्यानेच डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.