लालबागच्या राजाच्या दरबारी अवयवदान जनजागृती मोहीम

लालबागच्या राजाच्या दरबारी अवयवदान जनजागृती मोहीम

Published on

लालबागच्या राजाच्या दरबारी अवयवदान जनजागृती मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये यंदा अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. ग्लेनईगल्स रुग्णालय आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ परिसरात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे.
या ठिकाणी भाविकांना अवयवदानाची माहिती घेता येणार असून, नोंदणी व प्रतिज्ञाही करता येणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. अवयवदान हे सर्वोत्तम दान असून, ते एखाद्याचे जीवन वाचवू शकते. झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये आतापर्यंत २७ दाते पुढे आले आहेत. यामधून ८३ प्रत्यारोपण झाले असून, त्यात मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे आणि हात प्रत्यारोपणाचाही समावेश आहे, मात्र प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दात्यांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. जागरूकतेचा अभाव व संकोच ही या दरीची मुख्य कारणे असल्याने गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचा उद्देश आहे.
ग्लेनईगल्स रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपिन चेवले यांनी सांगितले की, गणपती बाप्पा जसे अडथळे दूर करतात तसे अवयवदानामुळे रुग्णांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन त्यांना जगण्याची दुसरी संधी मिळू शकते. मंडळाचे विश्वस्त सुधीर साळवी यांनी सांगितले की, भाविकांच्या उपस्थितीत अवयवदानाची प्रेरणा देऊन मृत्यूशी झुंजणाऱ्या रुग्णांना नवे आयुष्य मिळवून देण्याचा निस्वार्थ प्रयत्न या उपक्रमातून होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com