गणपती उत्सवात शिक्षकांची दिवाळी,
गणपती उत्सवात शिक्षकांची दिवाळी
५२ हजार शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर
मुंबई, ता. २५ : राज्यातील अनुदानित तत्त्वावर कार्यरत असलेल्या २० ते ६० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या तसेच अनुदानासाठी अघोषित असलेल्या तब्बल ५२ हजार २७६ शिक्षकांना ऐन गणेशोत्सवात वेतनवाढीची खुशखबर मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने या शिक्षकांना आज वाढीव टप्पा अनुदान जाहीर केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तब्बल ९७० कोटींहून अधिक निधी टप्पा अनुदानासाठी मंजूर केला आहे. यात २० ते ६० टक्के टप्पा अनुदानामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. पहिल्यांदाच नव्याने ११ नोव्हेंबर २०२२ नंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या व शासन स्तरावर अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या २३१ अघोषित शाळा आणि त्यावरील ६९५ तुकड्यांनाही २० टक्के अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या टप्पा अनुदानात प्रामुख्याने २० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या दाेन हजार ६९ शाळा तसेच चार हजार १८२ वर्ग तुकड्यांना अधिकचे २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाचा लाभ तब्बल १५ हजार ८५९ शिक्षक आणि शिक्षक केंद्र कर्मचाऱ्यांना होणार आहे. यापूर्वी ४० टक्के टप्पा अनुदानावर आलेल्या शाळांना आता अतिरिक्त २० टक्के अनुदान मंजूर झाले असून, त्यात एक हजार ८७१ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि त्यावरील दाेन हजार ५६१ वर्ग तुकड्यांना हे अनुदान मंजूर झाले आहे. याचा लाभ १३ हजार ९५९ शिक्षक आणि शिक्षकेतरांना होणार आहे.
६० टक्के टप्पा अनुदान घेत असलेल्या शिक्षकांना आता अधिकचे वाढीव २० टक्के अनुदान आणि त्यासाठीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा लाभ राज्यातील एकूण एक हजार ८९४ शाळा आणि त्यावरील दाेन हजार १९२ वर्ग तुकड्यांवरील १९ हजार ७४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. गणपती उत्सवातच आम्हाला अत्यंत आनंदाची बातमी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारामुळे मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या.
---
कोट
सरकारने शिक्षकांच्या टप्पा अनुदानासाठी शब्द दिला होता, तो पाळला. गणपती बाप्पांच्या आगमनासोबत आम्ही राज्यातील ५२ हजारांहून अधिक शिक्षकांना टप्पा अनुदानाचा लाभ देऊन त्यांचा उत्साह, आनंद वाढवला. नव्याने अघोषित शाळांनाही अनुदान दिले आहे.
- दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.