‘रो-रो’चा मुहूर्त हुकला

‘रो-रो’चा मुहूर्त हुकला

Published on

‘रो-रो’चा मुहूर्त हुकला
केंद्र सरकारची परवानगी; ‘सकाळ’च्या बातमीवर शिक्कामोर्तब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : कोकणवासीय आणि मुंबईकरांसाठी दिलासा ठरणारी रो-रो फेरी सेवा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. केंद्रीय शिपिंग विभागाकडून आवश्यक ती परवानगी मिळाली असली तरी गणेशोत्सवाच्या हंगामात ही सेवा सुरू होणार नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा कुठलाही फायदा होणार नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत सांगितले, ‘रो-रो बोटीला केंद्राच्या डीजी शिपिंग आणि राज्याच्या सर्व प्रकारचे परवाने सोमवारी मिळाले आहेत. यासंदर्भातील तब्बल १४७ परवानग्या मिळाल्या आहेत. परंतु सध्याचे हवामान प्रतिकूल असून समुद्र खवळलेला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता गणेशोत्सवात सेवा सुरू होणार नाही. समुद्रस्थिती सुधारल्यानंतरच ती सुरू करण्यात येईल. ‘सकाळ’ने ही सेवा गणेशोत्सवात सुरू होणार नसल्याचे वृत्त दिले होते. या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी
गणेशोत्सवाच्या काळात लाखो प्रवाशांना कोकणात जाताना मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूककोंडी, अपघातांचा धोका आणि तिकिटांसाठीची धावपळ करावी लागते. मात्र रो-रो बोटीची घोषणा कोकणवासीयांना मोठा दिलासा देणारी ठरत होती. दरम्यान, या गर्दीच्या काळातच सेवा सुरू होणार नसल्याने प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ‘प्रत्येक वेळी नवा बहाणा केला जातो. सेवा कधी सुरू होणार याची खात्री वाटेनाशी झाली आहे,’ असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.

वारंवार पुढे ढकलली जाणारी सेवा
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी रो-रो सेवा सुरू कण्याची आश्वासने विविध सरकारांकडून देण्यात आली. काही वेळा तांत्रिक कारणे, काही वेळा हवामान, तर काही वेळा परवानग्या या नावाखाली हा प्रकल्प वारंवार पुढे ढकलला गेला. आता परवानगी मिळाल्यानंतरसुद्धा गणेशोत्सवात सेवा सुरू न होणे ही नागरिकांसाठी निराशाजनक बाब ठरली आहे.


मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, की मुंबई ते कोकण रो-रो सेवा हवामान सुधारताच सुरू होईल. १ किंवा २ सप्टेंबरपासून ही सेवा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र हवामान सुधारताच ही ऐतिहासिक सेवा कार्यान्वित होणार आहे. भाऊचा धक्का ते जयगड तीन तास तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पाच तासांत प्रवास करता येणार आहे. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१४-१९ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रो-रो सेवेची संकल्पना मांडली होती. आज त्यांचे स्वप्न साकार होत असल्याचा मला आनंद आहे.
- नितेश राणे, मंत्री बंदरे विकास

सेवेची वैशिष्ट्ये
बोटीचे नाव : एम २ एम
प्रारंभस्थान : भाऊचा धक्का, मुंबई
थांबे : जयगड आणि विजयदुर्ग
वेग : २५ नॉट्स दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट
प्रवास वेळ : मुंबई - रत्नागिरी ३ ते ३.५ तास, मुंबई - सिंधुदुर्ग ५ तास
प्रवासी वर्ग : इकॉनॉमी ते फर्स्ट क्लास

एम २ एम फेरी सेवा
प्रवासी तिकीटदर प्रवासी आसन क्षमता
इकॉनॉमी - २,५०० ५५२
प्रीमियम इकॉनॉमी : ४,००० ४४
बिझनेस : ७,५०० ४८
प्रथम श्रेणी : ९,००० १२


वाहन दर
चारचाकी : ६,०००
दुचाकी : १,०००
सायकल : ६००
मिनी बस : १३,०००
मोठी बस : आसनक्षमतेनुसार

वाहन क्षमता
५० चारचाकी
३० दुचाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com