सायबर भामट्यांचे जाळे
सायबर भामट्यांचे जाळे
गणेशोत्सवात घरपोच प्रसाद, व्हीआयपी दर्शनाचे प्रलोभन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः गणेशोत्सवात घरपोच प्रसाद, ऑनलाइन दर्शन, व्हीआयपी पासपासून लॉटरी, फेस्टिव्हल ऑफर, कर्ज अशा विविध निमित्ते आणि प्रलोभनांद्वारे भक्तांना लुबाडण्यासाठी सायबर भामट्यांनी जाळे विणले आहे. सतर्क राहण्यासोबत अति आकर्षक सेवा किंवा अनाकलनीय सूट देणाऱ्या ॲप, संकेतस्थळे, जाहिरातींकडे थेट दुर्लक्ष करण्याचा सल्ला पोलिस आणि सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना देऊ केला आहे.
प्रत्येक सण उत्सवात, सुट्टीच्या हंगामात नागरिकांना लुबाडण्यासाठी सायबर भामटे निरनिराळ्या योजना पुढे करतात. सायबर सुरक्षा क्षेत्रात संशोधन करणाऱ्या बंगळूरू येथील ‘क्लाउडसेक’ या संस्थेने गणेशोत्सव काळात मुंबई महानगरासह देशभरात वेगवेगळ्या निमित्तांनी गणेशभक्तांची, नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामट्यांनी तयार केलेली फसवी ॲप, संकेतस्थळे, जाहिरातींचे बिंग फोडले आहे. तसेच विविध निमित्तांनी नागरिकांची कशी फसवणूक झाली याची उदाहरणेही दिली आहेत.
गणेशोत्सव सुरू होण्याआधी भामट्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसोबत पूजा साहित्य ऑनलाइन विक्रीबाबत फसव्या जाहिराती इन्स्टाग्राम, फेसबुकद्वारे सर्वदूर पसरविल्या. मातीच्या आकर्षक मूर्तींची छायाचित्रे आणि २५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट, निःशुल्क घरपोच सेवा, असे नमूद करीत भामट्यांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. अशा जाहिराती पाहून संपर्क साधणाऱ्या भक्तांकडून मूर्तीची किंमत आगाऊ घेण्यात आली. प्रत्यक्षात भक्तांच्या हाती मूर्ती पडलीच नाही.
मूर्तींसोबत फेस्टिव्हल ऑफर असे नमूद करीत विविध वस्तूंची स्वस्तात किंवा किरकोळ किमतीत विक्री, कमी व्याजदरात वाहन, गृहकर्ज आणि आकर्षक बक्षिसांसाठी सोडत, लकी ड्रॉ अशा फसव्या जाहिराती समाजमाध्यमांवर सुरू झाल्या.
गणेशोत्सव सुरू होताच घरपोच मिठाई, प्रसाद, प्रसिद्ध गणेश मंडळांचे व्हीआयपी पास, ऑनलाइन दर्शनाचे प्रलोभन दाखवत फसवी ॲप, संकेतस्थळे आणि जाहिरातींचा सुळसुळाट सुरू झाल्याचा दावा क्लाउडसेक संस्थेने आपल्या अहवालात केला आहे.
मिठाईचा चटका
पश्चिम उपनगरांतील प्रसिद्ध मिठाई विक्रेत्याच्या नावे भामट्यांनी समाजमाध्यमांवर फसवी जाहिरात केली. एका व्यावसायिकाने ही आकर्षक जाहिरात पाहून त्यावरील क्रमांकावर संपर्क साधला आणि साडेतीन हजार रुपये आगाऊ अदा करून मिठाई मागवली. ती मिठाई व्यावसायिकापर्यंत पोहोचलीच नाही. व्यावसायिकाने पाठपुरावा केला तेव्हा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून व्यावसायिकाकडून सुमारे सव्वा लाख रुपये तर त्याच्या मित्राकडून ४५ हजार रुपये उकळले. या दोघांनी संबंधित हलवयाकडे चौकशी केली तेव्हा त्याने आम्ही ऑनलाइन मिठाई विकत नाही. ही जाहिरात आमची नाही, असे सांगितले.
वर्गणी
पश्चिम उपनगरांतील एका व्यावसायिकाच्या कार्यालयात दोन आठवड्यांपूर्वी दोन व्यक्ती आल्या. व्यावसायिकाचे कार्यालय ऐक्य इमारतीच्या सहकारी संस्थेचे सभासद असून, आवारात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी वर्गणी मागण्यासाठी आली आहोत, असे या दोघांनी सांगितले. व्यावसायिकाने हजार रुपये रोख आणि या व्यक्तींनी दिलेल्या क्यूआर कोडवर २,१०० रुपये वर्गणी म्हणून वळते केले. काही वेळाने या व्यावसायिकाच्या खात्यातून दोन व्यवहारांद्वारे ३६ हजार रुपये भलत्याच खात्यांवर वळते झाले. ते समजताच व्यावसायिकाने चौकशी केली तेव्हा संबंधित इमारतीत गणेशोत्सव साजरा होत नाही, असे त्याला सांगण्यात आले.
जाळ्यात न अडकण्यासाठी
अति आकर्षक किंवा अतार्किक सवलत देऊ करणाऱ्या जाहिरातींकडे दुर्लक्ष करावे, असे प्रलोभन दाखवणाऱ्या समाजमाध्यमांवरील जाहिराती उघडू नयेत. ऑनलाइन वस्तू विकत घेताना विक्रेता किंवा ऑनलाइन विक्रीची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांच्या अधिकृत ॲप, संकेतस्थळाचा वापर करावा. संकेतस्थळाचा पत्ता, त्यातील स्पेलिंग तपासून घ्यावे. ऑनलाइन खरेदी केल्यास वस्तू हाती पडताच किंमत अदा करण्याचा पर्याय निवडावा, असे आवाहन सायबर पोलिस आणि क्लाउडसेकसारख्या संस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.