आता आरक्षण घेऊनच परत जाणार

आता आरक्षण घेऊनच परत जाणार

Published on

आता आरक्षण घेऊनच परत जाणार
भरपावसातही मराठा आंदोलक ठाम


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलक शुक्रवारी (ता. २९) मुंबईत धडकले. आझाद मैदान चिखलाने आणि पाण्याने भरले असतानाही आंदोलकांनी हार न मानता ठिय्या दिला. ‘आता आरक्षण घेऊनच परत जाणार,’ हा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील सकाळीच आझाद मैदानात दाखल झाले आणि ठरल्याप्रमाणे उपोषणास सुरुवात केली. अधिकृत परवानगी फक्त काही मोजक्या आंदोलकांनाच होती, तरीदेखील मराठा समाजाचे कार्यकर्ते बंदी झुगारून सीएसएमटी, महापालिका चौक आणि आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले. परिणामी संपूर्ण दक्षिण मुंबई आंदोलकांनी फुलून गेली. दरम्यान, सकाळपासूनच कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर वाढला. मैदानात पाणी साचून चिखल निर्माण झाला तरी आंदोलक मागे हटले नाहीत. काहींनी पावसात भिजत चिखलात उभे राहून घोषणाबाजी केली, तर काही थेट चिखलात बसून आंदोलनात सहभागी झाले. रेनकोट, छत्र्या घेऊन आलेल्यांनी त्या आधारावर सहभाग नोंदवला, तर इतर आंदोलक पावसात भिजतच संघर्ष करीत राहिले.

जरांगे पाटील म्हणाले त्याप्रमाणे ‘आता ही लढाई आरपारची आहे. आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार. आंदोलक ऊन, वारा, पाऊस काहीही आले तरी हटणार नाहीत. आम्ही अर्धी भाकर खाऊ, उघड्यावर राहू; पण आदेशापासून ढळणार नाही.’

आजच्या आंदोलनात महिलांची उपस्थिती कमी होती, मात्र तरुणांचा मोठा जमाव उपस्थित राहिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे तरुण आंदोलन कितीही दिवस चालले तरी ठामपणे टिकून राहणार असल्याचे सांगत होते. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांचा ओघ सुरूच होता. यामुळे आझाद मैदान परिसर घोषणाबाजीने आणि संघर्षाच्या तापाने पेटून राहिला.


..
पाऊस, चिखल आणि प्रतिकूल परिस्थिती कितीही आली तरी मराठा समाजाचा निर्धार ढळलेला नाही. आंदोलनावर ठाम राहून आपली मागणी अधिक जोमाने मांडणार आहोत.
- मदन यादव, आंदोलक


आरक्षणासाठीची ही झुंज आता निर्णायक टप्प्यात आलेली आहे. आंदोलकांचा उत्साह आणि एकजूट पाहता ही लढाई मागे हटणारी नाही, तर अंतिम निकालापर्यंत चालणारी आहे.
- दिलीप वरपे, आंदोलक


मनोज जरांगे-पाटलांचा अढळ निर्धार आणि नेतृत्वामुळे आंदोलनाला नवा जोश मिळत आहे. त्यांचे शब्दच आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
- मिठू म्हस्के, आंदोलक

तरुणाईचा वाढता सहभाग हेच या आंदोलनाचे बलस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या तरुणांच्या ओघामुळे आंदोलन थांबणार नाही, असा ठाम संदेश मुंबईतून गेला आहे.
- अविनाश गायकवाड, आंदोलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com