जरांगेंच्या आवाहनानंतरही आंदोलक आक्रमक
जरांगेंच्या आवाहनानंतरही आंदोलक आक्रमक
पोलिसांच्या सूचना धाब्यावर; सीएसएमटी परिसरात रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांनी रस्ते अडवू नका, सर्वसामान्यांना वेठीस धरू नका, असे आवाहन केले; मात्र त्यास भीक न घालता दुसऱ्या दिवशी हजारो मराठा आंदोलकांनी सीएसएमटी परिसरात रास्ता रोको केला. पोलिसांच्या आवाहनानंतरही आंदोलक हटत नसल्याचे परिसरात कोंडी झाली होती.
आझाद मैदान येथील उपोषणस्थळावरून शुक्रवारी (ता. २९) संध्याकाळी आणि शनिवारी (ता. ३०) सकाळी भाषणातून जरांगे यांनी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने आरक्षण मिळवण्याचे आपले ध्येय आहे, असे स्पष्ट केले. त्याच वेळी शहराबाहेरून आलेली वाहने पोलिस सांगतील तेथे उभी करा, रस्ते मोकळे करा, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही, अशी सूचनाही केली; मात्र आंदोलक शांत राहण्याऐवजी अधिक आक्रमक झाले.
जरांगे यांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून म्हणून वाहने मोकळ्या मैदानात तसेच पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी उभी करण्याची सूचना केली होती; मात्र जरांगे यांची सूचना डावलत आंदोलकांनी वाहने आझाद मैदानाच्या जितक्या जवळ नेता येतील, तितकी नेण्याचा चंग बांधला. परिणामी, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी परिसरात वाहनांनी गर्दी वाढली होती. आझाद मैदानाभोवतीच ४०० हून अधिक वाहने उभी केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
------
मनात येईल तेव्हा चक्काजाम
मराठा आंदोलकांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरून चक्का जाम केला. परिणामी, मशीद बंदरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचदरम्यान जरांगे यांनी उपोषणस्थळावरून पुन्हा आवाहन केले. पोलिसांनी त्यांचे आवाहन आंदोलकांना ऐकवले, तरीही ते मागे हटत नव्हते. अखेर पोलिसांनी हज हाउसकडून अडकलेली वाहतूक महात्मा फुले मंडईच्या दिशेने, मेट्रो चित्रपटगृहाकडून दक्षिणेकडे वळवली. मागचा मार्ग मोकळा होताच पुढील बाजूला खोळंबलेली वाहने मागे घेत मंडईकडून वळवली. हाच प्रकार दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा घडला. तेव्हाही पोलिसांनी वाहने मागच्या मागे वळवून दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ केली.
----
आणखी किती दिवस..?
वाहने मार्गस्थ होताच चक्काजाम करणारे आंदोलक अधिक आक्रमक झाले. कर्कश संगीतावर ठेका धरत घोषणाबाजी केली. किती दिवस गाड्या रिव्हर्स घेणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी दिली.
---
दिसेल त्या ठिकाणी ठिय्या
आझाद मैदानात आडोसा नसल्याने आंदोलकांनी परिसरात मिळेल त्या जागी पथारी पसरली. सीएसएमटी स्थानकातील मोकळे आवार, फलाट, आत-बाहेर पडण्याच्या मार्गावरही कब्जा केला. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. याशिवाय परिसरातील बेस्ट थांबे, पदपथ, दुकानांचा आडोसा, किल्ला कोर्टाच्या आवारातही आंदोलकांनी पथारी पसरल्याचे चित्र दिसत होते.
----
बम्बई हमको जम गई
जरांगे उपोषण करीत असलेल्या आझाद मैदानात अभंग, भजन, कीर्तन, आरत्या आदी प्रसन्न वातावरण असले तरी मैदानाबाहेर पालिका मुख्यालयासमोरील चौकात हिंदी संगीतावर आंदोलकांनी ठिय्या दिला. त्यातल्या त्यात ‘स्वर्ग’ चित्रपटातील ‘बम्बई हमको जम गई’ ही गीत अविश्रांतपणे सुरू होते. या संगीतावर वाहनांवर चढून, रस्त्यांमध्ये उभे राहून आंदोलक नृत्य करताना दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.