‘समुदाय किचन’मुळे आंदोलकांना दिलासा
‘समुदाय किचन’मुळे आंदोलकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठलेल्या आंदोलकांची शुक्रवारी (ता. २९) मोठी गैरसोय झाली. अन्न-पाण्यावाचून त्यांना उपाशी राहावे लागले. शनिवारी मात्र चित्र बदलल्याचे दिसून आले. विविध राजकीय पक्ष, समाज संघटना आणि समुदायांनी पुढाकार घेत आंदोलकांसाठी ‘समुदाय किचन’द्वारे भोजनाची व्यवस्था सुरू केली आहे.
फोर्ट, नागपाडा, भायखळा परिसरात स्थानिक सिंधी आणि मुस्लिम समाजबांधवांनी आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. त्यामुळे आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, मुलुंड, बोरिवली या विभागांतून मराठा समाजाकडून जेवणाची सोय केली जात आहे. कल्याण मराठा समाज तसेच आमदारांच्या मदतीने ठिकठिकाणी उपाहारगृहे सुरू करण्यात आली आहेत. राज्यभर नेमलेल्या सुमारे सव्वालाख समन्वयकांनी या जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे. नवी मुंबईत आंदोलकांची अन्नधान्याची वाहने अडवल्यामुळे शुक्रवारी मोठी अडचण निर्माण झाली होती. आंदोलकांना तिथेच स्वयंपाक करून जेवण करावे लागले. आज शनिवारपासून मात्र मुंबईतच भोजनाची सोय सुरू झाली. डबेवाल्यांनीही आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे.
पक्षाच्या वतीने मराठा आंदोलकांना मदत करीत आहोत. दक्षिण मुंबईत कालपासून आमचे विभागप्रमुख संतोष शिंदे जेवणाची व्यवस्था करीत आहेत.
- हर्षल प्रधान, प्रवक्ते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलकांना जेवण-पाणी पुरवत आहेत. तसेच काँग्रेस कार्यालयाचा हॉल मुक्कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- सुरेशचंद्र राजहंस, मुख्य प्रवक्ता, मुंबई काँग्रेस
गावखेड्यातून आलेल्या आंदोलकांची अडचण लक्षात घेऊन शुक्रवारी पाणीवाटप केले. रविवारी जेवण वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे.
- नीलेश मोहिते, अध्यक्ष, दलित युथ पँथर
खेडोपाड्यातून आलेल्या आंदोलकांची गैरसोय होऊ नये, ही मुंबईकरांची जबाबदारी आहे. म्हणूनच आज आम्ही पाण्याच्या बाटल्या आणि दोन टेम्पोभर बिस्किटांचे वाटप केले.
- संतोष दौडकर, सामाजिक कार्यकर्ते
मुस्लिम बांधवांसाठी आम्ही आरक्षणाची मागणी करतो. त्यामुळे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. दक्षिण मुंबईतील हॉटेल्समध्ये आंदोलकांसाठी जेवण व नाश्ता तयार केला. अनेक मशिदींमध्येही अन्न शिजवले गेले.
- युसूफ अब्राहणी, कार्यकारी अध्यक्ष, समाजवादी पक्ष, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.