सगेसोयऱ्यांकडून मराठा आंदोलकांची व्यवस्था
सगेसोयऱ्यांकडून मराठा आंदोलकांची व्यवस्था
दिवसभर आझाद मैदानात ठिय्या; रात्री नातेवाइकांकडे मुक्काम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांना मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात असलेल्या नातेवाइकांची लाखमोलाची मदत होत आहे. दिवसभर आझाद मैदानात ठिय्या अन् रात्री नातेवाइकांच्या घरी मुक्काम असा अनेक आंदोलकांचा दिनक्रम सुरू आहे. तसेच आझाद मैदानापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट स्थानक नजीकच असल्याने त्यांना सगेसोयरे, नातेवाइकांकडे जाण्यासाठी लोकल प्रवास सोयीचा ठरत आहे. त्यामुळे लोकल रेल्वेमध्येही आंदोलकांची गर्दी दिसत आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातून मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून आंदोलनासाठी गावागावातून आलेल्या आपल्या बांधवांची व्यवस्था केली जात आहे. रात्रीचे जेवण, मुक्काम आणि सकाळी अंघोळ, नाश्ता करून आंदोलक पुन्हा लोकलने आझाद मैदानावर येत आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेला हा दिनक्रम आंदोलन सुरू असेपर्यंत राहणार असल्याचे विलास शेळके या आंदोलकाने सांगितले.
---
लोकलमुळे ये-जा करणे सोयीचे
आझाद मैदानापासून जवळच पश्चिम आणि मध्य रेल्वेची लोकल सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे आंदोलक सकाळ आणि संध्याकाळी लोकलने आपल्या नातेवाइकांच्या घरी पोहोचत आहेत. लोकलमुळे येणे-जाणे सोयीचे झाले आहे.
---
स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी लढा!
आरक्षणाचा लढा अधिक काळ चालणार आहे. त्यामुळे आम्ही गावावरून येतानाच मोठ्या तयारीनिशी आलो आहोत. तसेच येथील बांधव आमची व्यवस्था करीत आहेत. कारण हा लढा आम्ही स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी लढतो आहोत, असे अमोल जाधव यांनी सांगितले. मुंबईसह परिसरात अनेक आंदोलकांचे सगेसोयरे आहेत. त्यांचाही आम्हाला मोठा आधार आहे. जेवणाबरोबरच मोबाईल चार्जिंगची सोय त्यांच्याकडून होत असल्याचे विवेक चव्हाण म्हणाले.
----
मुंबईकर गावी आल्यानंतर त्यांना आम्ही सांभळतो. आज आम्ही मुंबईत आल्याने तेदेखील होईल तशी मदत करीत आहेत. अनेक जण रात्री मुक्कामाला आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीकडे जात असून, पुन्हा सकाळी आंदोलनस्थळी येतात.
- गोविंद पाटील, आंदोलक
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

