मराठा आंदोलनाबाबत पोलिसांची संयमी भूमिका
आंदोलनाबाबत पोलिसांची संयमी भूमिका
आझाद मैदान परिसरापर्यंतच मर्यादित ठेवण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः मागील तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत मुंबई पोलिसांनी संयमी भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य मुंबईकर वेठीस धरले जाऊन नयेत, यासाठी कारवाई वा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी पोलिसांनी हे आंदोलन केवळ आझाद मैदान आणि परिसरापुरतेच मर्यादित राहावे, या दृष्टीने रणनीती आखल्याचे समजते.
मराठा आंदोलकांनी सीएसएमटी आणि महापालिका मुख्यालयासमोरील चौक जवळपास ताब्यात घेतला आहे. वाडी बंदरपासून आझाद मैदानापर्यंत दुतर्फा वाहने उभी करण्यात आली आहेत. त्यातच सोमवारी मुंबईतील नोकरदार, व्यावसायिक, श्रमिकांची नियमित धावपळ सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी पोलिस परवानगी पत्रात दिलेल्या सूचनेप्रमाणे कायदेशीर कारवाईबाबत निर्णायक भूमिका घेतील किंवा प्रतिबंधात्मक उपाय योजून हा सर्व परिसर मोकळा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र पोलिसांनी बचावात्मक पवित्र घेत सीएसएमटीमार्गे फोर्ट, कुलाबा, कफ परेड येथे जाणारे सर्व मार्ग रविवारी बंद केले. वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला. तसेच सीएसएमटी स्थानक आंदोलकांच्या ताब्यातून मोकळे करण्याऐवजी राज्य रेल्वे पोलिस (जीआरपी) प्रवाशांसाठी वाट मोकळी करावी, असे आवाहन आंदोलकांना करणार आहेत. पाऊस पडल्यावर आडोशासाठी तसेच वाहन वा राहण्याची व्यवस्था नसलेले आंदोलक रात्री मुक्कामासाठी सीएसएमटी स्थानकात येतात. नियमित प्रवाशांना सोमवारी अडचण होऊ नये, यासाठी पहाटेपासून आंदोलकांना अन्यत्र आडोसा घेण्याचे आवाहन केले जाईल.
----
वाढीव परवानगीबाबत संभ्रम
आंदोलन पुढे सुरू ठेवण्याबाबत पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या परवानगीबाबत रविवारी संभ्रम निर्माण झाला. परवानगी दिली की नाकारली याबाबत पोलिसांनी स्पष्ट भाष्य करणे टाळले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
----
बुधवार जिकिरीचा
सोमवारी गौरीपूजन आणि मंगळवारी गौरी विसर्जनानिमित्त सुट्टी असल्याने या दोन दिवसांत सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या मुंबईकरांची संख्या तुलनेने कमी असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. आंदोलन सुरू राहिल्यास बुधवार जिकिरीचा ठरेल, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले.
-----
मुंबईची वेस बंद
पोलिसांनी रविवारी वाशी, ऐरोली तसेच मुंबईच्या अन्य वेशींवर मोठा फौजफाटा लावून आंदोलकांची शहरात येणारी वाहने रोखली. त्यांना शहराबाहेर व्यवस्था करण्यात आलेल्या पार्किंग स्थळी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

