लोकमान्य सेवा मंडळाचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा
लोकमान्य सेवा मंडळाचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा
सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करून जनजागृती करण्यासाठी, त्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. तीच परंपरा जपत कुर्ला परीघ खाडीचे लोकमान्य सेवा मंडळाने गेल्या चार दशकांपासून गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यानुसार यंदा गणरायाच्या मंडपात ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा साकारण्यात आला आहे. तसेच मंडळाकडून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमान्य सेवा मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून ‘ऑपरेशन सिंदूर’ची प्रतिकृती साकारली आहे, ती पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव काळात मंडळाकडून रक्तदान शिबिराबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे मंडळाचे सभासद अमोल सोलनकर यांनी सांगितले. दरम्यान, परीघ खाडी परिसरात सातत्याने पावसाचे पाणी भरते. त्यामुळे येथील रहिवाशांना मंडळाकडून मदतीचा हात दिला जातो. वर्षभर मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वेगळेपण जपण्यावर भर
गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये वेगळेपण जपण्यावर मंडळाकडून सातत्याने भर दिला जात आहे. यंदा आपल्या देशाने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा साकारला असून मागील वर्षी भारताच्या जिंकलेल्या टी-२० वर्ल्ड कपचा विजयोत्सवाचा देखावा होता, तर त्याआधी चित्रकला स्पर्धेत चिमुरड्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, पंढरीची वारी असे हुबेहूब देखावे साकारले होते.