लालबागचा राजा मंडळासह महापालिकेविरोधात निदर्शने
लालबागचा राजा मंडळासह महापालिकेविरोधात निदर्शने
मराठा आंदोलक संतप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर ठिय्या देणारे आंदोलक आज लालबागचा राजा मंडळ आणि महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झाले. महापालिकेसमोरील सेल्फी पॉइंटवर उभे राहून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निषेध नोंदवला.
बीडमधून आलेल्या आंदोलकांनी आरोप केला, ‘‘लालबागचा राजा मंडळात दर्शनासाठी गेलेल्या काही आंदोलकांना स्वयंसेवकांनी अपमानास्पद वागणूक देत पिटाळले. याशिवाय जेवणावळीही बंद करण्यास भाग पाडण्यात आले. या मंडळाला माणुसकी नाही. भविष्यात आपल्या लेकरांना सांगू की या मंडळात दर्शनाला कधीही जाऊ नका.’’ महापालिका प्रशासनावरही आंदोलकांनी तीव्र आगपाखड केली. ‘‘ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असली तरी मराठा आंदोलकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नाही. शौचालयांची टंचाई आहे. अशा परिस्थितीत आम्हाला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत,’’ असा आरोप आंदोलकांनी केला.
...
कर्मचाऱ्यांना पळवले
महापालिका आणि रेल्वे मुख्यालयासमोर हजारोंच्या संख्येने आंदोलक जमल्याने कार्यालयातील अनेक कर्मचारी गच्चीवर उभे राहून आंदोलनाचे फोटो काढत होते. हे पाहून आंदोलक संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांचा संताप पाहताच संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने गच्चीतून काढता पाय घेतला.
...
लालबागच्या राजाला सोन्याचे दागिने चढवायला पैसे आहेत; पण मराठा बांधवांना पोटभर जेवण द्यायला माणुसकी नाही का? दर्शनासाठी येऊ नका, असे आमचे आवाहन आहे.
- धनंजय तंबुरे, आंदोलक
...
महापालिका देशातील सर्वांत श्रीमंत म्हणवते; पण आंदोलकांना पिण्याचे पाणी आणि शौचालयाचीही सोय नाही. ही जनतेची थट्टा आहे.
- विजय पाटील, आंदोलक
...
आम्हाला मंडपातून पिटाळले. असे केल्यास भविष्यात या मंडळात जनता दर्शनाला जाणार नाही.
- रमेश ढेरे, आंदोलक
...
छायाचित्रे काढून तमाशा बघणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर पळ काढतात. सुविधा देत नाहीत. जनतेच्या करातून पगार घेणारे हे नोकर आहेत की मिरवणुकीचे प्रेक्षक?
- हर्षल खुळे, आंदोलक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.