मुंबईत आंदोलकांची सहा हजार वाहने!

मुंबईत आंदोलकांची सहा हजार वाहने!

Published on

मुंबईत आंदोलकांची सहा हजार वाहने!
रस्ते मोकळे करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान परिसरातील रस्ते मोकळे करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, शहरात आंदोलकांची सुमारे सहा हजार वाहने तळ ठोकून आहेत. मुंबईने शेजारील महानगरांमधून दररोज ये-जा करणाऱ्या आंदोलकांची संख्या ४० ते ५० हजारांच्या आसपास असावी.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टपासून आंदोलकांची सुमारे ११ हजार वाहने मुंबईत धडकली. त्यातील पाच हजार वाहने आपापल्या भागात परतली आहेत. मुंबईत असलेल्या वाहनांपैकी सुमारे ४०० वाहने आझाद मैदान परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा उभी आहेत. त्याव्यतिरिक्त वाडीबंदरकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर जागा मिळेल तिथे आंदोलकांची वाहने उभी आहेत.
पोलिसांनी आंदोलनासाठी आझाद मैदानातील सात हजार चौरस मीटर भागात परवानगी दिली होती. ती परवानगी देताना पोलिसांनी या राखीव भागात पाच हजार व्यक्ती सामावतील इतकीच या भागाची मर्यादा आहे, असे नमूद केले होते. त्यातच आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांच्याप्रमाणे आंदोलकांसाठी छत नसल्याने पाऊस सुरू झाल्यास पाच हजार आंदोलकही तेथे थांबू शकत नाहीत. त्यामुळे जागा मिळेल तेथे आडोसा, निवारा घेणाऱ्या अंदाजे ४० हजार आंदोलकांना कुठे आणि कसे हलवावे, हा प्रश्न पोलिस, प्रशासनासमोर असेल.
----
जरांगेंचे आवाहन ऐकतील?
सोमवारी संध्याकाळी उच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मराठा आंदोलन प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनीही पत्रकार परिषदेत आंदोलकांना आझाद मैदान येथे थांबा, वाहने पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेतच उभी करा, पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य करा, असे आवाहन केले आहे; मात्र आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच जरांगे यांच्या नियंत्रणाबाहेर असलेले आंदोलक त्यांचे हे आवाहन कितपत ऐकतील, याबाबत पोलिसांना शंका आहे.
---
आयोजकांकडून सूचना
मराठा आंदोलन आयोजकांकडून आझाद मैदान परिसरात जागोजागी स्पीकर लावून आंदोलकांना सूचना केल्या जात आहेत. आझाद मैदानाभोवती रुग्णालये असून, गोंगाट करू नका, शांतता पाळा, नियम पाळा, पोलिसांना सहकार्य करा, त्यांच्याशी हुज्जत घालू नका, वाहतुकीस अडथळा आणू नका, रस्त्याऐवजी पदपथांवर थांबा, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल, अशी कोणतीही कृती करू नका, असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com