मराठा आंदोलनाने लोकलसेवा विस्कळित
मराठा आंदोलनाने लोकलसेवा विस्कळित
सीएसएमटी, वाशी स्थानकात आंदोलक रुळावर; वाहतूक २५ मिनिटे उशिराने
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका सोमवारी मुंबईकरांना बसला. सीएसएमटी आणि वाशी स्थानकात आंदोलक अचानक रुळावर उतरले. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणाबाजीसह आंदोलकांनी लोकल वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफने तातडीने हस्तक्षेप करीत आंदोलकांना बाजूला केले. त्यामुळे लोकल सेवेला २० ते २५ मिनिटांचा विलंब सहन करावा लागला.
मागील चार दिवसांपासून आझाद मैदानात मराठा आंदोलन सुरू आहे. सोबतच सीएसएमटी स्थानकात हजारो आंदोलकांनी ठाण मांडले आहे. स्थानकातच जेवण, झोप, खेळ सुरू असल्याने लोकलमध्ये चढ-उतार करताना सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच सोमवारी दुपारी आंदोलकांचा मोठा गट थेट वाशी स्थानकात शिरला. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्यावर जाण्यासाठी आंदोलकांनी रेल्वे रूळ ओलांडले. दुसरीकडे सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २वर पनवेल लोकलसमोरच आंदोलक रेल्वे रुळावर उतरले. अचानक समोर गर्दी आल्याने स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस आणि आरपीएफ जवानांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलकांना हटवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
----
मोटरमन केबिनवर पोस्टर
दरम्यान, सीएसएमटी स्थानकात आंदोलकांनी हार्बर मार्गावरील एका लोकलच्या मोटरमन केबिनवर पोस्टर चिकटवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने आंदोलक स्थानकात असल्याने मोटरमनना धोका निर्माण होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष सूचना दिल्या आहेत. स्थानकातून गाड्या घेताना आणि सोडताना काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी लोकलचा वेग मंदावला आहे.
---
मुंबईकरांना विलंब
लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी लोकलवर विसंबून असतात. आंदोलनामुळे लोकल सेवेत व्यत्यय आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांच्या गर्दीमुळे अनेक नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.
----
प्रवाशांनी बदलला मार्ग
मराठा आंदोलनामुळे आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडल्याने नोकरदार प्रवाशांना प्रवासात अडचणी आल्या. विशेषतः कुलाबा आणि दक्षिण मुंबईकडे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकात उतरण्याऐवजी पर्यायी मार्ग शोधला. अनेकांनी दादरवरून थेट चर्चगेट लोकल पकडत आपले कार्यालय गाठले. त्यामुळे दादर ते चर्चगेट मार्गावरील लोकलमध्ये सकाळच्या गर्दीपेक्षा अधिक प्रवासी दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.