आंदोलनाचा कष्टकऱ्यांना फटका
आंदोलनाचा कष्टकऱ्यांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मराठा आंदोलनामुळे सलग पाच दिवस दक्षिण मुंबई ठप्प झाली. आझाद मैदानावरील आंदोलनाचा परिणाम थेट क्रॉफर्ड मार्केटवर झाला. मुंबईतील सर्वात जुने व मोठे महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) कडकडीत बंद राहिल्याने हजारो मजुरांची रोजीरोटी धोक्यात आली होती. विशेषतः हातावर पोट असणारे आणि परप्रांतीय कामगार अक्षरशः हवालदिल झाले. वाहतूक कोलमडल्याने मालवाहतूक गाड्या पूर्णपणे बंद होत्या, मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी या कामगारांनी हातगाडीचा आधार घेतला. दुकाने, मॉल्स तसेच घराघरांतून ऑर्डर आलेल्या मालाची डिलिव्हरी हातगाड्यांमधून सुरू झाली. आंदोलकांच्या गर्दीतून हातगाड्यांना वाट काढता आल्याने कामगारांनी काम थोडेफार सुरू ठेवले.
मालाची ने-आण करून कामगारांना दिवसाला ८०० ते हजार रुपये मिळत होते, पण बाजारपेठ ठप्प झाल्याने रोजंदारी कोसळली. तरीसुद्धा हातगाडीवरून डिलिव्हरी केल्यामुळे दिवसाला ४०० ते ५०० रुपये तरी मिळू लागले. काहीही न मिळण्यापेक्षा अर्धपोटापुरते का होईना, पण मिळतेय हेच समाधान आहे, असे या कष्टकऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनामुळे बाजारपेठ बंद असली तरी आंदोलकांनी कामगारांच्या जेवणाची सोय केली. यामुळे जेवणाखाण्याचा प्रश्न मार्गी लागला, मात्र पोटापाण्याच्या समस्येवर स्थायी तोडगा निघावा, यासाठी या कामगारांनी सरकारकडे अपेक्षा व्यक्त केली. तसेच आंदोलकांच्या मागण्यांची दखलही सरकारने घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
पाच दिवस आम्ही काहीच कमावलं नाही. घरच्यांना पैसे पाठवायचे होते. आता हातगाडीनं डिलिव्हरी करत आहे. रोज ४००-५०० रुपये मिळतायत, काहीतरी मिळतंय ते बरे.
- महिपत पाडाव, हातगाडीचालक
मार्केट बंद झालं, ट्रक थांबले, पण आम्ही हातगाडीवरून काम सुरू ठेवलं. आंदोलकांमुळे बाजार बंद झाला, पण त्यांच्यामुळेच आम्हाला जेवणाची सोय झाली. पोटासाठी लढा दोन्हीकडे आहे.
- शिवकुमार यादव, हातगाडीचालक
आम्ही दिवसभर माल उचलतो, वाहतो. आंदोलनामुळे आमचं पोट अडचणीत आलं. सरकारनं लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर आमचं रोजचं जीवन जगणं कठीण होईल."
- शफिउल्ला खान, हातगाडीचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.