मराठा आंदोलन सुटले; गणपती मंडप भक्तांनी फुलले!
मराठा आंदोलन सुटले; गणपती मंडप भक्तांनी फुलले!
गणरायाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा; दोन दिवसांत गर्दी वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : ऐन गणेशोत्सवातच मराठा समाजाने आरक्षणासाठी फोर्ट परिसरात ठिय्या दिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे इच्छा असूनही गणेशभक्तांनी गणरायाच्या दर्शनाकडे पाठ फिरवली होती, मात्र मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा निघाला आणि अवघ्या चार तसांत त्यांनी मुंबई रिकामी केली. त्यामुळे गणेशभक्तांनी सुटकेचा निःश्वास टाकत रात्री दहानंतर दर्शनासाठी रांगा लावल्या. त्यामुळे भक्तांच्या प्रतीक्षेत असलेले गणपती मंडप गर्दीने फुलले होते. आंदोलन संपल्यामुळे बुधवापासून मुंबईबाहेरून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढण्याची चिन्ह आहेत.
गणेश चतुर्थीला बुधवारी मुंबईसह राज्यभरात धुमधडाक्यात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गर्दीचे चोख नियोजन केले होते, मात्र गणपतीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशीच मराठा समाजाने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. त्यामुळे फोर्टसह दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भक्तांनी चार दिवस गणपती दर्शनाला जाणे टाळल्याने मंडपातील वातावरण सुनेसुने होते. त्याबाबत मंडळांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिल्याने त्यांनी सायंकाळी आंदोलन मागे घेत मुंबईचा निरोप घेतला. त्यामुळे गणेशभक्तांची रात्रीपासून दर्शनासाठी गर्दी होऊ लागल्याचे फोर्टच्या इच्छापूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांनी सांगितले.
रात्रीच्या दर्शनावर भर
मेट्रोच्या तिन्ही मार्गांवर रात्री उशिरापर्यंत मेट्रोसेवा चालवली जात आहे. त्यामुळे अनेक गणेशभक्तांकडून दिवसभर कार्यालयात काम करून सहकुटुंब रात्रीचे गणपती दर्शन घेण्यावर भर दिला जात आहे. परिणामी गणेश मंडपात रात्रीची गर्दी जास्त दिसत आहे.
प्रसिद्ध गणपती मंडळांना फटका
लालबागचा राजा आणि गणेशगल्ली गणपती मंडळाला भेट द्यायला राज्यभरातून गणेशभक्त येतात. मराठा आरक्षण आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मुख्यतः दक्षिण मुंबईत झाली होती. याचा थोडाफार फटका या प्रसिद्द मंडळांना बसला, मुंबई बाहेरून विशेषतः पुण्यावरून रस्ते मार्गे येणाऱ्या भाविकांनी वाहतूक कोंडीचे दृष्य बघता, येण्याचा बेत रद्द केला, मात्र आंदोलन संपल्यामुळे आता आजपासून मुंबईत दर्शनाला येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या वाढणार आहे.
मराठा आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडल्याने गेले चार-पाच दिवस दर्शनासाठी किरकोळ गर्दी होती, पण मंगळवारी आंदोलक गावोगावी गेल्याने आता पुन्हा गणपती मंडप भाविकांनी गजबाजू लागले आहे. आमच्या गणपतीच्या दर्शनासाठी रात्री ११ वाजल्यापासून लसगलेली रांग पहाटेपर्यंत होती.
- प्रकाश कनावजे,
अध्यक्ष, गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जवळपास २० हजार भक्तांनी गणपतीचे दर्शन घेतले होते, मात्र त्यानंतर फोर्ट परिसरात आंदोलकांनी ठिय्या दिल्याने सदरची गर्दी रोडावली होती, पण मंगळवारी रात्रीपासून पुन्हा गर्दी सुरू झाली आहे. दररोज १५-१६ हजार गणेशभक्त दर्शनाला येत आहेत.
- रवींद्र सुर्वे, अध्यक्ष, फोर्टचा इच्छापूर्ती गणेश
- मराठा आंदोलनामुळे गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीवर परिणाम झाला होता, मात्र मंगळवारी सायंकाळपासून पूर्वीसारखीच गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे आम्ही गणेशोत्सवासाठी घेतलेल्या मेहनतीचे सार्थक होऊ लागले आहे.
- गणेश लिंगायत, सचिव, गिरगावचा राजा
- आंदोलन संपल्याने फोर्ट परिसरातील गणपतीच्या दर्शनासाठी भक्तगण आता गर्दी करू लागले आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत भक्तांची गर्दी आणखी वाढेल.
- अमोल जाधव, अध्यक्ष, फोर्टचा राजा