सातासमुद्रापार गणपती उत्सवाचा उत्साह
सातासमुद्रापार गणपती उत्सवाचा उत्साह
पिट्सबर्ग मराठी मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात भक्तिमय कार्यक्रम
मुंबई, ता. ३ ः नोकरी आणि विविध व्यवसायासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या तसेच अमेरिकेत नव्याने गेलेल्या शेकडो मराठीबांधवांनी आपल्या गणपती बाप्पाचा उत्सव सातासमुद्रपार साजरा केला. अमेरिकेतील दक्षिण-पश्चिमी पेंसिल्वेनिया राज्यात असलेल्या पिट्सबर्ग येथील पिट्सबर्ग मराठी मंडळ (एमएमपीजीएच) आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठापना, अथर्वशीर्ष पठण व आरतीनंतर भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. महाप्रसादाच्या वेळी सुमारे ७०० पेक्षा जास्त भक्तांना भोजन देण्यात आले. एवढी मोठी गर्दी असूनही स्वयंसेवकांनी दोनदा स्वयंपाक करून प्रत्येकाला प्रसाद मिळेल, याची काळजी घेतली. शेवटचा थाळीप्रसाद अन्नसेवक टीमलाच देण्यात आला, हे त्यांच्या सेवाभावाचे व नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण ठरले. या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एआय तंत्रज्ञानावर आधारित चलतचित्र सजावट. यात गणेश व कार्तिकेय यांच्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या कथेला देखण्या पद्धतीने साकारण्यात आले होते. या नवकल्पनात्मक सजावटीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिट्सबर्ग मराठी शाळा, मराठी युवाविभाग तसेच अमेरिकेतील नावाजलेल्या विद्यापीठांपैकी सीएमयू, यू पीआयटीटी आणि डूकेन विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. सजावटीच्या टीमने यावर्षी उंची गाठली तर ढोल-ताशा व लेझीम पथकाने उत्सवात ऊर्जा ओतली. सातासमुद्रापार भरलेल्या या गणपती उत्सवात दररोज संध्याकाळी ७.३० वाजता गणपतीची आरती पार पडत असून, गणेश विसर्जन मिरवणूक ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिली.
३९ वर्षांची परंपरा
पिट्सबर्गमध्ये मराठी समाजाकडून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आता ३९ वर्षांची झाली आहे. या उत्सवामुळे परदेशात राहूनही मराठी लोकांना आपली संस्कृती, परंपरा आणि एकोप्याचा वारसा जपण्याची संधी मिळते. हा सोहळा म्हणजे अमेरिकेतील मराठी समुदायासाठी धार्मिक व सांस्कृतिक ओळख जपणारे व्यासपीठ ठरले आहे. गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून संस्कृती, भक्ती व समुदाय एकोप्याचे प्रतीक असल्याचे देशमुख यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.