व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड

व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड

Published on

व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड 
लालबाग परिसरात गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; सामान्यांची प्रवेशासाठी रेटारेटी
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ३ : लालबाग परिसरात ‘मुंबईचा राजा आणि  लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी केवळ मुंबईच नव्हे तर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. सेलिब्रिटीही  हजेरी लावतात. आठव्या दिवशी ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. यामध्ये सामान्य लोकांनी  रांगेतून प्रवेश करण्यासाठी रेटारेटी केली होती. तर   व्हीआयपी गेटवर आमदार पत्र धारकांची झुंबड उडाली होती. 
राज्यासह देशभरात  २७ ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन झाले. दीड, अडीच, पाच आणि सात दिवसांचे गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईकर गणपती दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. दरवर्षी ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात, त्या गर्दीतही राजाचे मनमोहक रूप भाविक आपल्या डोळ्यांत साठवतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाजवळच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली अर्थात ‘मुंबईचा राजा’ आहे.  रांगेत प्रवेशासाठी सामान्य  प्रयत्न करीत होते; मात्र त्यांना ‘लालबागच्या राजा’चे कार्यकर्ते  आणि  पोलिस पाठीमागे ढकलत होते. त्यामुळे भाविकांना त्रास झाला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत भाविक ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते. 

२० टक्के गर्दी वाढली 
गौरी आणि गणपती  विसर्जनानंतर २० टक्के भाविकांची संख्या वाढली आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनामुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडले नव्हते; परंतु मंगळवारी आंदोलन संपल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली झाली आहे. त्यामध्ये गुरुवारी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे.  

गौरी आणि गणपती  विसर्जनानंतर भाविकांची संख्या वाढली आहे. आज प्रचंड गर्दी आहे. त्याचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. 
- बाळासाहेब कांबळे,
अध्यक्ष, लालबागचा राजा 

मी दर्शनासाठी मंगळवारी रात्री ९.४५ वाजता नवसाच्या रांगेत उभी होते. बुधवारी पहाटे चार वाजता मला दर्शन मिळाले. खूप चांगले वाटले.  
- कविता शुक्ला,
भाविक, धारावी  

मी  मुंबईत दोन ते तीन वेळा आलो आहे. यंदा प्रथमच गणेशोत्सव काळात यायला मिळाले. खूप चांगला उत्सव आहे. मी त्याचा आनंद घेतला.  
- बॅस्टिअन   स्वाईब ,
पर्यटक , जर्मनी  

मी भोपाळला राहते. माझा एक लहान अपघात झाला होता. त्या वेळी मी लालबागला दर्शनासाठी येण्याचे ठरवले होते. आता कुटुंबीयांसह आले आहे. 
- मुस्कान हेबनानी ,
भाविक, भोपाळ 

मी पुणे येथून कुटुंबीयांसह ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आलो. एवढी गर्दी पाहता किती वेळ लागेल, सांगता येत नाही. 
- ज्ञानेश्वर  रोकडे,
भाविक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com