खेतवाडीच्या गणरायाला अजिंठा लेणीचा आरास
खेतवाडीच्या गणरायाला अजिंठा लेणीची आरास
२५ कारागिरांनी महिनाभर मेहनतीने हुबेहूब साकारला देखावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : लालबाग, परळ, गिरगाव म्हणजे गणेशोत्सवाचे माहेरघर. येथील प्रत्येक चाळीत, गल्लीत पाच-सहा दशकांची परंपरा असलेली मंडळे असून, त्यांच्याकडून हटके सजावट, आरास केली जाते. तिच परंपरा गिरगाव येथील खेतवाडी १३ गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जोपासली जात असून, त्यांनी यंदा प्राचीन अजिंठा लेणींचा हुबेहूब देखावा साकारला आहे. भव्य स्वरूपातील आगळीवेगळी सजावट पाहण्याबरोबरच गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांकडून मोठी गर्दी केली जात आहे.
खेतवाडी १३ गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणरायाला मुंबईचा अनंत म्हणूनही ओळखले जाते. मंडळाकडून दरवर्षी हिंदू संस्कृतीला साजेशी अशी आरास केली जाते. यंदा मूर्तिकार अरुण दत्त यांनी तब्बल १६ फूट उंचीची अमरनाथ महादेव रूपातील गणरायाची आकर्षक मूर्ती साकारली आहे, तर कलादिग्दर्शक सुरेश माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली २५ कलाकारांनी एक महिना अविश्रांत मेहनत घेत अजिंठा लेणीची प्रतिकृती तयार केली आहे. हटके सजावटीमुळे भक्त दर्शनाबरोबरच सजावट पाहण्यासाठी हजेरी लावत असल्याची माहिती मंडळाचे सचिव चेतन माने यांनी दिली.
श्वेत रंग हीच ओळख
गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळ्या रंगांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, मात्र शांततेचे प्रतीक असलेला श्वेत रंग ही खेतवाडीच्या अनंतची ओळख झाली आहे. सदर मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवात श्वेत रंगाची गणरायाची मूर्ती विराजमान केली जाते. त्यामुळे आगळावेगळा गणपती म्हणून याकडे पाहिले जाते.
१० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
या मंडळाकडून सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी १० गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये एवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून दिली जाते. त्याचबरोबर मंडळाकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी एक हजार नागरिकांना भंडाऱ्याच्या माध्यमातून अन्नदान केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.