वाहतूक कोंडीवर उतारा

वाहतूक कोंडीवर उतारा

Published on

वाहतूक कोंडीवर उतारा
महामार्ग विभाग स्‍थापन करण्याचा महापालिकेचा प्रस्‍ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पहिल्यांदाच स्वतंत्र महामार्ग विभाग (हायवे सेल) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा विभाग महापालिकेच्या रस्ते विभागांतर्गत कार्यरत राहील आणि त्याचे नेतृत्व मुख्य अभियंता (रस्ते) करतील. मात्र वाहतूक कोंडीवर हा उपाय ठरू शकणार नसल्याचे मत वाहतूकतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
महापालिकेने तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएकडून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या देखभालीचे काम आपल्या ताब्यात घेतले असले तरी आतापर्यंतच्या उपाययोजना केवळ तात्पुरत्या राहिल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी काही कमी झाली नाही.

या नव्या विभागामार्फत द्रुतगती महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन व सर्वसमावेशक धोरण तयार केले जाईल. मुख्य मार्ग, सेवा रस्‍ते आणि उड्डाणपुलांची क्षमता व स्थिती तपासणे, संपूर्ण पायाभूत सुविधा सुधारणे, रस्ता रुंदीतील असमानता दूर करणे, आवश्यक असल्यास रस्ता रुंदीकरणासाठी जमिनीचे संपादन करणे यावर भर दिला जाणार आहे.
सध्या पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील १० हून अधिक महत्त्वाचे पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहेत. त्यावर टोल आकारणी सुरू असल्याने ते महापालिकेला हस्तांतरित करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. यात वकोला, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, आरे, मागाठाणे, नॅशनल पार्क, दिंडोशी इत्यादी पूल पश्चिम द्रुतगती महामार्गावर आहेत. तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर, कुर्ला, विक्रोळी जंक्शन व जेव्हीएलआर उड्डाणपूल एमएसआरडीसीकडे आहेत.

लेनमधील असमानता
खार, वांद्रे यासारख्या भागात सहा लेनचे रस्ते आहेत, तर अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवलीत फक्त तीन-चार लेन आहेत. या विसंगतींमुळे सततची कोंडी होत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महामार्ग विभागात केवळ द्रुतगती महामार्गाशी संबंधित काम पाहणारे कार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते व उपअभियंते नेमले जातील. इतर प्रकल्पांमध्ये त्यांना गुंतवले जाणार नाही. हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.
.......

मुंबई महापालिकेने विशेष सेल स्थापन केल्यामुळे  देखभाल- दुरुस्तीला फायदा नक्की होईल. खड्ड्यांमुळे होणारे अपघात कमी होतील, पण कोंडीवर हा उपाय ठरू शकणार नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी  जैसे थे राहील. 
- ए. व्ही. शेणॉय, वाहतूक तज्ज्ञ
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com