‘धारावीकर नवरा नको ग बाई!’

‘धारावीकर नवरा नको ग बाई!’

Published on

‘धारावीकर नवरा नको गं बाई!’
लग्नासाठी धारावीला तरुणींचा नापसंती सूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतील तरुणांपुढे गेल्या काही वर्षांपासून एक नवे संकट उभे राहिले आहे. धारावीत लग्न करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना ‘वधू’ शोधण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. गेल्या अनेक वर्षांपासून धारावीत सक्रिय असणाऱ्या विविध वधू-वर सूचक मंडळांकडून ही माहिती समोर आली आहे.
लग्नानंतर धारावीत संसार थाटायला बहुतांश तरुणींचा नकार असल्याने स्थानिक तरुणांच्या ‘शुभमंगला’चा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. गावाकडच्या आणि छोट्या शहरांमधल्या मुलीदेखील लग्नासाठी धारावीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.
धारावीतील पंचरत्न महापुरुष मंडळ हे गेल्या तीन वर्षांपासून वधू-वर मेळावा घेत आहे, मात्र मेळाव्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. धारावीत राहणाऱ्या मुलांना बाहेरच्या मुली स्वीकारत नाही. धारावीतील मुलींची लग्न जुळवायला फारसा त्रास होत नाही, मात्र बाहेरच्या मुली धारावीत येण्यास अजिबात तयार नसल्याचे मंडळाचे पदाधिकारी नंदकिशोर नारायणे यांनी सांगितले.
चित्रपट आणि सोशल मीडियातून धारावीची काळी बाजू मोठ्या प्रमाणात दाखवली जाते. त्यामुळे इथले सगळे तरुण ‘बिघडलेले’ असल्याचा समज पसरला आहे. असे स्थानिक पातळीवर वधू-वर सूचक मंडळाचे काम करणाऱ्या डी सेल्विन नाडर यांचे मत आहे. भावी नवरा सुशिक्षित, सुसंस्कृत व समाजात प्रतिष्ठा असणारा असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. असा वर धारावीत शोधून सापडणारच नाही, असा गैरसमज अनेक तरुणींनी करून घेतला आहे.
धारावीतील बहुतांशी घरांमध्ये स्वतंत्र शौचालय नसून अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांची अवस्थाही फारच बिकट आहे. हादेखील मुले नाकारण्यामागचा मोठा फॅक्टर आहे, असे सेल्विन सांगतात.
धारावीत राहणाऱ्या मुकेश चौधरी (नाव बदलले) यांच्या मुलाचे गेल्या चार वर्षांपासून लग्न जुळत नाही. केवळ धारावीत राहत असल्यामुळे नकार मिळतोय याची त्यांना जाणीव आहे. अखेरीस त्यांनी आपल्या मुलाच्या आंतरजातीय विवाहाला होकार दिल्याचे त्यांनी सांगितले. धारावीबाहेरच्या जगाने इथल्या तरुणांविषयी चुकीचं चित्र उभं केलं आहे, ते सहजासहजी बदलता येणार नाही, असे त्यांनी सागितले.

गेल्या १५-२० वर्षांपासून धारावीतले स्थळ नाकारण्याचा विचार अधिक बळावला आहे. धारावीत राहून बाहेर गेलेली माणसेदेखील आपल्या मुली धारावीत देणे पंसत करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
- नंदकिशोर नारायणे, पदाधिकारी, पंचरत्न महापुरुष मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com