गणेशोत्सवात सायबर जनजागृती

गणेशोत्सवात सायबर जनजागृती

Published on

गणेशोत्सवात सायबर जनजागृती
फसवणूक टाळण्यासाठी भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
मुंबई, ता. ४ : भामट्यांकडून विविध सण-उत्सव किंवा विविध निमित्ताने सायबर फसवणूक करण्यासाठी योजना आखल्या जातात. यंदाचा गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. मात्र सायबर सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संस्था, सायबर तज्ज्ञांनी आणि काही गणेशोत्‍सव मंंडळांनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून अनोख्या पद्धतीने जनजागृती सुरू केली आहे.
सायबर सुरक्षा क्षेत्रात संशोधन करणाऱ्या बंगळूर येथील क्लाउडसेक या संस्थेने मुंबई महानगरासह देशभरातील विविध शहरांत संशोधन करून गणेशोत्सवाच्या काळात भामट्यांकडून विविध निमित्ताने होऊ घातलेली सायबर फसवणूक उजेडात आणली. या संस्थेने गणेशोत्सव काळात समाजमाध्यमांवर पसरवण्यात आलेल्या फसव्या जाहिराती, फसवी ॲप आदींबाबत उदाहरणे देत नागरिकांना सतर्क केले होते.
सायबर तज्‍ज्ञ गौतम मंगल यांनी गणेशोत्सव सुरू झाल्या झाल्याच एक पोस्ट समाजमाध्यमांवरून शेअर केली. त्यात आई पार्वतीच्या सूचनेवरून बालगणेशाने थेट वडील शिवशंकराचीच वाट अडवली होती, या प्रसंगाचा आधार घेत खासगी, शासकीय क्षेत्रात भक्कम एक्सेस कंट्रोल किती महत्त्वाचा आहे, याबाबत संदेश दिला. बालगणेश आपल्या वडिलांची, खुद्द शंकराची वाट अडवू शकतो; मग तुम्ही का नाही? तुम्ही तुमच्या संस्थेतील ऑनलाइन प्रणालीच्या सुरक्षेबाबत गंभीर का नाही, तुम्ही कोणालाही (सायबर भामटे/हॅकर) तुमच्या प्रणालीत शिरू द्याल का, असे प्रश्न विचारले आहेत.
मुंबईच्या सायबरफ्रॅट या सायबर सुरक्षा क्षेत्रात कार्यरत संस्थेने गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनजागृतीपर रील तयार केले आहेत. त्यातील एक गणेश विसर्जनावर आधारित आहे. पडताळणी न करता एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे, समाजमाध्यमांवर प्रलोभने दाखवणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवणे, मेसेज-व्हॉट्सॲपद्वारे समोर येणारी प्रत्येक लिंक उघडणे, अनोळखी ॲप डाउनलोड करणे या वाईट सवई असून, त्यांचे यंदा गणेशमूर्तीसोबत विसर्जन करू या, असा संदेश अनोख्या पद्धतीने सायबरफ्रॅटने दिला आहे.
याव्यतिरिक्त शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारा देखावा उभा केला आहे.

मुंबई पोलिसांचे आवाहन
मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाआधी साजऱ्या झालेल्या कृष्ण जन्माष्टमीचे निमित्त साधून अनोख्या पद्धतीने सायबर फसवणूक आणि भामट्यांविरोधात जनजागृतीचा प्रयत्न केला होता. यातील एका रीलमध्ये सायबर भामट्यांचा उल्लेख असुर अर्थात राक्षस असा केला आहे. कालिया, बकासुर, नरकासुराप्रमाणे सायबर भामट्यांना पहिल्या प्रयत्नात ब्लॉक करा, असा संदेश पोलिसांनी दिला आहे. अन्य रीलमध्ये मोहाला बळी पडू नका, हा महत्त्वाचा संदेश गीतेमध्ये कृष्णाने दिल्याची आठवण पोलिसांनी नागरिकांना करून दिली आहे.

पुराणातील प्रसंग, घटना आणि सद्य:स्थितीतील सायबर भामट्यांच्या योजना यात संबंध जोडून केलेली जनजागृती नागरिकांचे लक्ष वेधतेच, पण त्यासोबत ती मनामनावर सहज बिंबवता येते. देव-देवतांपासून लहान मुलांच्या लाडक्या कार्टून पात्रांना घेऊन तयार केलेले जनजागृतीपर साहित्य पाहणाऱ्यांची (व्ह्यू) संख्या अधिक असते.
- गौतम मेंगळे, सायबरतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com