महापालिकाच चालवणार 
आता अतिदक्षता विभाग

महापालिकाच चालवणार आता अतिदक्षता विभाग

Published on

महापालिकाच चालवणार
आता अतिदक्षता विभाग
चार रुग्णालयांतील कंत्राटदारांना हटवले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महापालिकेने मोठा निर्णय घेत उपनगरी चार रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग (आयसीयू) सेवांमधून खासगी ठेकेदार हटवण्यात आले आहेत. या विभागांचे संचालन महापालिकेचे डॉक्टर करणार आहेत. डीएनबी अभ्यासक्रमातील शिक्षक, बंधनकारक सेवेसाठी असलेले डॉक्टर आणि निवासी डॉक्टर यांच्यावर आयसीयू चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काही वर्षांपासून महापालिकेने उपनगरी रुग्णालयांतील आयसीयू आणि वैद्यकीय अतिदक्षता विभाग (एमआयसीयू) चालवण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली होती; मात्र ठेकेदारांकडून पाठवले जाणारे डॉक्टर आणि त्यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी व अनियमितता समोर आल्या. त्यामुळे कंत्राटदारांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

आतापर्यंत कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय आणि विक्रोळीतील कमला नेहरू रुग्णालय या ठिकाणचे वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग खासगी संस्थांकडे सोपवले होते. शताब्दी रुग्णालयाचा आयसीयू युनिव्हर्सल मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडे, तर उर्वरित तीन रुग्णालयांचे आयसीयू ‘साई संजीवनी’ संस्थेकडे होते. या संस्था करार संपल्यानंतरही तात्पुरत्या मुदतवाढीवर काम करीत होत्या; मात्र आता महापालिकेने त्यांना हटवले आहे. उपनगरी रुग्णालयातील डीएनबी शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की ‘आयसीयू व एमआयसीयू चालवण्याची जबाबदारी आम्हाला देण्यात आली आहे. डीएनबीचे निवासी डॉक्टर आणि बंधनकारक सेवेसाठी नियुक्त डॉक्टर आयसीयूमध्ये कायम असतील. डीएनबी शिक्षक दिवसभर उपस्थित राहून सकाळी राउंड घेतील आणि पुढे ऑन कॉल उपलब्ध राहून निवासी डॉक्टरांना मार्गदर्शन करतील.’

बनावट कागदपत्रांमुळे कंत्राट रद्द
- महापालिकेतील सूत्रांच्या माहितीनुसार, ठेकेदारांना हटवण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांनी पाठवलेल्या काही डॉक्टरांच्या कागदपत्रांत गंभीर अनियमितता आढळली. व्ही. एन. देसाई रुग्णालयात ‘साई संजीवनी’ संस्थेकडून एका डॉक्टरने बनावट एमएमसी प्रमाणपत्र जमा करून काम केल्याचा प्रकार उघड झाला होता.
- संबंधित संस्थेचे कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. महापालिकेच्या रुग्णालयांत पुरेसे डॉक्टर असल्यामुळे खासगी कंत्राटाची गरजच नव्हती, असे तज्ज्ञांचे मत आहे. शताब्दी रुग्णालयात औषधनिर्मिती, शस्त्रक्रिया व भूलशास्त्र विभागात डीएनबी शिक्षक, पीजी वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ डॉक्टर मिळून ३० हून अधिक डॉक्टर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com