लोकल प्रवाशांची कोंडी संपणार कधी?
लोकल प्रवाशांची कोंडी संपणार कधी?
‘एमयूटीपी’वर कोट्यवधींचा खर्च; गर्दी मात्र कायम
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईतील उपनगरी रेल्वेने दररोज तब्बल ७५ लाख प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. गर्दी, अपघातांचा धोका आणि सतत होणारा उशीर कमी करण्यासाठी २००२ पासून मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) सुरू झाला. या प्रकल्पावर आतापर्यंत हजारो कोटी खर्च झाले; मात्र सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकेसारखी महत्त्वाची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. परिणामी, लाखो प्रवासी दररोज गर्दीत अन् जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.
रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) महत्त्वाकांक्षी ‘एमयूटीपी-२’ प्रकल्पाअंतर्गत सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गिकेचा समावेश आहे. ही मार्गिका झाली असती, तर गाड्यांची वारंवारिता वाढवणे शक्य झाले असते; मात्र भूसंपादन तसेच निधीअभावी व प्रशासनातील गोंधळामुळे हा प्रकल्प कित्येक वर्षांपासून कागदावरच आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे आठ हजार कोटी रुपये असून त्याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.
---
खर्च वाढला, दिलासा नाही
एमयूटीपी-२ साठी ५,३०० कोटींचा खर्च अपेक्षित होता, तो दुप्पट झाला आहे. एमयूटीपी-३ साठी १०,९४७ कोटींचा अंदाज होता, तोही प्रचंड वाढला आहे. प्रत्येक टप्प्यात मूळ अंदाजापेक्षा दोन ते तीन पट खर्च होत आहे; पण इतका पैसा खर्चूनही प्रवाशांची गर्दी, गाड्यांना होणारा विलंब, सिग्नलमधील बिघाड यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही.
---
एमयूटीपी प्रकल्पाचा खर्च व स्थिती
प्रकल्प खर्च (कोटींत) स्थिती
एमयूटीपी-१ ४,५०० २००३ मध्ये सुरू; २०११ मध्ये पूर्ण
एमयूटीपी-२ ५,३०० २००८ मध्ये सुरू, २०२७मध्ये पूर्ण होणे अपेक्षित
एमयूटीपी-३ १०,९४७ काही कामे सुरू, बहुतेक रेंगाळलेली
एमयूटीपी-३बी ३३,६९० मंत्रिमंडळ मंजुरी, निविदा प्रक्रिया प्रलंबित
कुर्ला-सीएसएमटी पाचवी-सहावी मार्गिका ८,००० केवळ कागदावर
एमयूटीपी-४ ४०,००० अभ्यास व नियोजन टप्पा
----
प्रकल्पाची टप्प्यानुसार स्थिती
१. एमयूटीपी-१
सुरुवात : २००२-२००३
पूर्ण : २०११
कामे : लोकल रेल्वे सुधारणा, नव्या गाड्यांची खरेदी, सिग्नल प्रणाली सुधारणा, रस्ता-रेल्वे समन्वय (जागतिक बँक सहकार्य)
स्थिती : काम पूर्ण
---
२. एमयूटीपी-२
सुरुवात : २००८
प्रमुख प्रकल्प :
- सीएसएमटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका
- बोरिवली ते मुंबई सेंट्रल सहावी मार्गिका
- ठाणे ते दिवा अतिरिक्त मार्गिका
- हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार
- डीसी ते एसी वीज रूपांतर
- नव्या लोकल गाड्या, तपासणी मार्गिका
- रेल्वेस्थानकात सुधारणा
खर्च : ५,३०० कोटी (जागतिक बँकेचे सह-निधी)
स्थिती : काही कामे पूर्ण, अनेक कामे अद्याप अपूर्ण
---
३. एमयूटीपी-३
प्रमुख प्रकल्प :
- विरार ते डहाणू चौथी मार्गिका
- पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी मार्गिका
- बेकायदा रेल्वे क्रॉसिंग बंद करणे, स्थानकात सुधारणा
- ऐरोली ते कळवा जोडणी
स्थिती :
- पनवेल ते कर्जत मार्गाचे ६७ टक्के काम पूर्ण
- इतर प्रकल्प प्रलंबित
---
४. एमयूटीपी-३अ
मंजुरी : मार्च २०१९
प्रमुख घटक :
- सीएसएमटी ते पनवेल वेगवान मार्ग
- हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत विस्तार
- बोरिवली ते विरार पाचवी व सहावी मार्गिका
- कल्याण ते आसनगाव चौथी मार्गिका
- कल्याण ते बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका
- सीबीटीसी सिग्नल प्रणाली
- २१० एसी लोकल गाड्या खरेदी
- रेल्वेस्थानक सुधारणा
खर्च : ३३,६९० ते ५४,७७७ कोटी
स्थिती : कामांना मंजुरी, काही प्राथमिक अंमलबजावणी सुरू, बहुतांश प्रकल्प प्रलंबित
---
५. एमयूटीपी-३ब
प्रस्तावित प्रकल्प :
- बदलापूर ते कर्जत तिसरी व चौथी मार्गिका (३२.४६ किमी)
- आसनगाव ते कसारा चौथी मार्गिका (३४.९७ कि.मी)
- पनवेल ते वसई नवीन उपनगरी मार्ग (६९.२३ कि.मी)
- २३८ एसी लोकल गाड्यांची खरेदी
खर्च : १४,९०७ कोटी
स्थिती : राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; निविदा प्रक्रिया व निधी व्यवस्था सुरू
-----
निवडणुकीच्या तोंडावर प्रकल्पांना मंजुरी दिली जाते; पण ते पूर्ण केव्हा होणार, याचा हिशेब कुणी देत नाही. जुने प्रकल्प रखडलेले असतानाच नव्या घोषणा करून प्रवाशांची दिशाभूल केली जाते.
- सुभाष हरिचंद्र गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
----
अर्धवट प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. कुर्ला-सीएसएमटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेची कामे अपूर्ण असताना, रेल्वेने २,८५६ वंदे मेट्रो खरेदीची घोषणा केली आहे. अर्धवट प्रकल्प बाजूला ठेवत नवे स्वप्न दाखवण्यात काही अर्थ नाही.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी प्रवासी महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.