वाजतगाजत उत्साहात गणरायांना निरोप
वाजतगाजत उत्साहात गणरायांना निरोप
‘लालबागचा राजा’च्या विसर्जनाला विलंब
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात, मिरवणुकांनी ‘मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’च्या आर्जवात गणरायांना शनिवारी (ता. ६) भक्तिभावाने निरोप दिला. चौपाट्यांवर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शहर आणि उपनगरात दिवसभर मिरवणुकांचा उत्साह ओसंडून वाहत होता, सायंकाळपासून त्यास उधाण आले. अनेकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या मिरवणुकीला मोठी गर्दी झाली होती; मात्र भरती-ओहोटीमुळे आणि तराफ्याच्या तांत्रिक अडचणीमुळे राजाच्या विसर्जनाला अपूर्व विलंब झाला.
‘लालबागच्या राजा’ची शनिवारी दुपारी १२ वाजता मंडपातून निघालेली मिरवणूक तब्बल २२ तासांच्या प्रवासानंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचली; मात्र तिथे गेल्यावर भरती-ओहोटीमुळे आणि तराफ्याच्या तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया रखडली. तत्पूर्वी ही मिरवणूक रविवारी सकाळी सात वाजता ऑपेरा हाउस येथे दाखल झाली. येथे गणरायाला भव्य फुलांचा हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीचा उत्साह आणखी वाढला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ‘लालबागचा राजा’ गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. अनंत अंबानींसह अनेक मान्यवरांनीही विसर्जन मिरवणुकीला उपस्थिती लावली. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे चौपाटीवर उत्सवाचा माहोल रंगला.
...
अत्याधुनिक तराफा अपयशी
यंदा ‘लालबाग राजा’चे विसर्जन स्वयंचलित व अत्याधुनिक तराफ्यातून करण्याचा निर्णय घेतला गेला; परंतु हा तराफा मूर्तीच्या उंचीपेक्षा जास्त उंच असल्याने मूर्ती चढवण्यात अडचणी आल्या. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतरही यश आले नाही. त्यामुळे नवीन तराफा मागवावा लागला.
...
भरतीमुळे अडथळे
सकाळी ११.४० वाजता समुद्रात ४.४२ मीटरची भरती आल्याने मूर्ती विसर्जन करणे धोक्याचे ठरले. यानंतर प्रशासन आणि मंडळाने संध्याकाळच्या ओहोटीपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी पाच वाजल्यानंतर ओहोटी लागल्यानंतर मूर्ती नवीन तराफ्यावर चढवण्यात यश मिळाले; मात्र पाण्याचा स्तर अधिक असल्याने मूर्ती विसर्जन शक्य झाले नाही. त्यामुळे अखेरीस रात्री उशिरा विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
...
भरती वेळेपेक्षा लवकर आली ः सुधीर साळवी
लालबाग राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले, भरती वेळेपेक्षा लवकर आली आणि आम्हाला पोहोचायला १०-१५ मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे विसर्जन भरती-ओहोटीच्या मध्ये अडकले. प्रशासन आणि मंडळाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. रात्री उशिरा ओहोटी झाल्यानंतर मूर्ती विसर्जन करण्यात येईल.
...
अखेरच्या दर्शनासाठी भक्तांची प्रतीक्षा
गिरगाव चौपाटीवर हजारोंच्या संख्येने भक्तांचा सागर उसळला आहे. परदेशी पाहुणेही विसर्जन सोहळा पाहण्यासाठी चौपाटीवर दाखल झाले होते. ‘लालबागच्या राजा’च्या अखेरच्या दर्शनासाठी भक्त अधीर झाले होते.
.........
‘चिंतामणी’चे विसर्जन वेळेत
‘लालबागच्या राजा’सोबतच चिंचपोकळीच्या चिंतामणीची मिरवणूकही सकाळीच चौपाटीवर पोहोचली होती. चिंतामणीचे विसर्जन सकाळी ७.४५च्या सुमारास पार पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.