"भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज – गगराणी"
भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी मुंबई सज्ज : गगराणी
जगभरातील तज्ज्ञांसह मुंबईत आपत्ती व्यवस्थापनाचे मंथन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांचा सामना करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने सज्ज आहे. आता जागतिक अनुभवांचा लाभ घेऊन शहर अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उद्देशाने महापालिका व संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नागरी आपत्ती जोखीम सक्षमता’ या विषयावर तीनदिवसीय कार्यशाळेला सोमवारी (ता. ८) दादर येथे सुरुवात झाली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, “मुंबईवर अनेक निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटे आली, तरी प्रत्येकवेळी मुंबईकरांनी त्यांचा सामना धैर्याने केला आहे; मात्र बदलते हवामान, वाढती लोकसंख्या व नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, अभिजित बांगर, जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्यासह संयुक्त राष्ट्रसंघाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच भारतातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेत ‘मेकिंग सिटीज रेजिलियंट २०३०’ या संकल्पनेवर सविस्तर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन संचालक महेश नार्वेकर यांनी ‘मुंबईतील पूर नियंत्रण, ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, नदी पुनरुज्जीवन योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ अशा उपाययोजनांची माहिती दिली, तर गिफ्ट सिटीचे प्रमुख राजीव शर्मा यांनी त्यांच्या शहरातील अनुभव मांडले.
आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन
संयुक्त राष्ट्रसंघाचे तज्ज्ञ संजय भाटिया यांनी “जोखीम सौम्यीकरण म्हणजे भविष्यातील आर्थिक नुकसान टाळण्याची गुंतवणूक” असे सांगत शहरांना आपत्ती समर्थ बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गगराणी यांनी मुंबईकरांचे विशेष कौतुक करताना म्हटले की, संकटसमयी मुंबईकर एकमेकांना मदत करतात, चोरी-लूटमारसारखे प्रसंग घडत नाहीत, हीच मुंबईची ताकद आहे. कार्यशाळा १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, जागतिक अनुभवांमधून मुंबईला आपत्ती व्यवस्थापनासाठी नवे मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.