रुग्‍णालयांच्या खासगीकरणाला विरोध

रुग्‍णालयांच्या खासगीकरणाला विरोध

Published on

रुग्‍णालयांच्या खासगीकरणाला विरोध
सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर देऊ नका ः सामाजिक संस्‍थांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भगवती, अग्रवाल रुग्णालयापाठोपाठ गोवंडीतील शताब्दी रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर खासगी संस्थेला देण्याची पालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध असून, लवकरच पालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने आपल्या रुग्णालयांचे व्यवस्थापन खासगी संस्थांना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयानुसार, अनेक रुग्णालयांच्या खासगीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयासाठी तीन खासगी संस्थांनी स्वारस्य दाखवले आहे. या संस्थांपैकी एका पात्र संस्थेची निवड करून रुग्णालयाचे संचालन त्या संस्थेकडे सोपवले जाणार आहे. या संस्थेमार्फत गोवंडी शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचीही महापालिकेची योजना आहे. त्यामुळे येथेही रुग्णांना सायन रुग्णालयाप्रमाणे उपचार मिळतील, असा पालिका प्रशासनाचा दावा आहे.
शताब्दी रुग्णालय हे मुंबईतील मानखुर्द, गोवंडीसारख्या अत्यंत मागासलेल्या भागात स्थित आहे. या भागातील १५ लाखांहून अधिक लोकसंख्या आरोग्यसेवेसाठी या रुग्णालयावर अवलंबून आहे.
महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. भूषण गगरानी यांनी आरोग्यसेवांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरण लागू केले जाणार असल्याची घोषणा केली होती. आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की सध्या फक्त गोवंडी शताब्दी रुग्णालयासाठी तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. या संस्थांशी चर्चा करून महापालिकेच्या अटींनुसार एका संस्थेला रुग्णालयाचे संचालन देण्यात येईल.
निवड होणाऱ्या खासगी संस्थेला किमान पाच ते १० वर्षांचा स्पेशालिटी किंवा सुपरस्पेशालिटी रुग्णालय चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. खासगीकरणामुळे रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे. स्पेशालिटी ओपीडीसाठी किमान ३०० रुपये आणि सुपरस्पेशालिटी ओपीडी सेवेसाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाईल. सध्या महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये हीच सेवा केवळ १० रुपयांत दिली जाते.

गोरगरिबांसाठी महत्त्वाचे असलेले रुग्णालय प्रशासन खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. या निर्णयाविरोधात प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारून प्रशासनाचा डाव हाणून पाडणार आहोत.
- राजेंद्र नगराळे, सामाजिक कार्यकर्ते

पालिका रुग्णालयाचे खासगीकरण करणे अतिशय चुकीचे आहे. इमारत बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च करून दुसऱ्याच्या हातात इमारत देणे चुकीचे आहे. यातून रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होणार आहे.
- सचिन खडतरे,
सामाजिक कार्यकर्ते

सार्वजनिक आरोग्यसेवा ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. यासाठी ही रुग्णालये उभारली गेली आहेत. मात्र आज शिक्षण, आरोग्यसारख्या मूलभूत सेवांनाही खासगी ठेकेदारांच्या हवाली करून कल्याणकारी राज्याच्या तत्त्वांना मूठमाती देत आहेत.
- बबन ठोके,
- समन्यवक, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com