बीकेसीतील कोंडीवर ‘शुल्का’चा उतारा

बीकेसीतील कोंडीवर ‘शुल्का’चा उतारा

Published on

बीकेसीतील कोंडीवर ‘शुल्का’चा उतारा
वाहनांना शुल्‍क आकारण्याचा विचार; सल्लागाराकडून अहवाल घेणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली असून, सायंकाळी तर परिस्थिती बिकट बनत आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करूनही फारसे यश मिळत नाही. त्यामुळे संकुलात येणाऱ्या वाहनांवर वाहतूक कोंडी शुल्क आकारण्याचा विचार आहे. त्याबाबत एमएमआरडीएच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारची शुल्क आकारणी व्यवहार्य ठरेल का, याबाबत सल्लागाराच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वांद्रे-कुर्ला संकुल सुमारे २५० हेक्टर जागेवर वसले असून, त्यामध्ये वेगवेगळ्या बँका, कंपन्यांची कार्यालये असून, त्यामध्ये जवळपास दोन लाख कर्मचारी काम करतात. सुमारे चार लाख लोक दररोज बीकेसीमध्ये येतात तसेच जवळपास ४० हजार वाहने दररोज बीकेसीच्या रस्त्यावरून जातात. त्यामध्ये येथे कामासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी म्हणून या रस्त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे किंवा जवळ पडते म्हणून बीकेसीतील रस्त्यांचा वापर करणाऱ्या आणि ५० मिनिटांपेक्षा कमी वेळेत येथून बाहेर पडणाऱ्या वाहनांवर त्यांचे येथे काम नसतानाही केवळ कनेक्टिव्हिटी म्हणून बीकेसीतील रस्त्यांचा वापर केल्याचे गृहीत धरून न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन, लंडनच्या मध्यवर्ती भागाप्रमाणे वाहतूक कोंडीचे शुल्क आकारण्याचा विचार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खासगी आणि अवजड वाहने लक्ष्य
सध्या बीकेसीमध्ये जाण्यासाठी शीव-धारावीतून, बिकेसी जोडणी, कुर्ला डेपो, कुर्ला सिग्नल, कलानगर, सरकारी वसाहत वांद्रे या ठिकाणांहून प्रवेश करता येतो. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने अनेक खासगी गाड्या, अवजड वाहने गरज नसतानाही बीकेसीतून जातात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असून, ती फोडण्याबरोबरच अनावश्यक बीकेसीत येणाऱ्या वाहनधारकांना चाप लावण्यासाठी वाहन कोंडी शुल्क लावता येईल का, यावर विचार सुरू आहे. तसेच लोकांचा सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढला जाऊ शकेल.

कुठे आकारले जाते शुल्क?
सध्या अमेरिकेत न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन, लंडन, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट सिंगापूर, स्टॉकहोम अशा प्रमुख ठिकाणी अनावश्यकपणे येणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडी शुल्क आकारले जाते. त्याच धर्तीवर बीकेसीमध्ये असे शुल्क लावून वाहतूक कोंडी फोडता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. हा निर्णय झाल्यास वाहनांवर वाहतूक कोंडी शुल्क आकारणारे बीकेसी हे देशातील पाहिले ठिकाण ठरू शकणार आहे.

वाहन नोंदणी यंत्रणा
सध्या बीकेसीमधून पूर्व-पश्चिम जाण्यासाठी ३०-३५ मिनिटे लागतात. त्यामुळे वाहनाने बीकेसीमध्ये प्रवेश केल्यापासून अवघ्या ५० मिनिटांत बाहेर जाईल. बीकेसीत कोणतेही काम नसताना केवळ पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी वापर केल्याचे गृहीत धरून शुल्क आकारले जाईल. त्यासाठी बीकेसीच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांची नोंद करणारी यंत्रणा उभारली जाईल. त्यामध्ये प्रत्येक वाहनाची नोंद होऊन बाहेर पडताना वेळेचा हिशोब करून शुल्क आकारणी केली जाईल. दरम्यान, हे कमाईचे साधन म्हणून नाही तर वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.


- बीकेसीत कामासाठी येणारे लोक - २ लाख
- दररोज भेट देणारे लोक - ४ लाख
- दररोज येणारी वाहने - ४० हजार
- प्रवेश-निर्गमन - सहा ठिकाणी

बीकेसीसारख्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाहनांवर शुल्‍क लावणे चांगले आहे. त्यामुळे अनावश्यक वाहनांची गर्दी कमी होईल, मात्र त्याआधी बीकेसीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करायला हवी.
- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा,
वाहतूकतज्ज्ञ

बीकेसीसह संपूर्ण मुंबईत वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ बीकेसीमधील वाहतूक कोंडी न सोडवता सर्वच ठिकाणच्या सुरळीत वाहतुकीसाठी प्रयत्न करायला हवेत. अनधिकृत पार्किंग हटवायला हवे.
- अनिल गलगली,
सामजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com