प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची सर्रास विक्री

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची सर्रास विक्री

Published on

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची सर्रास विक्री
राज्यभरात ‘ओव्हर द काउंटर’चे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईसह राज्यातील तब्बल ९० टक्के औषधे ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच विशेषतः कफ सिरप यांची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘ओव्हर द काउंटर’ स्वरूपात मिळणाऱ्या या औषधांची संख्या आणि मागणी वाढत असून, त्यावर नियंत्रण राखण्यात औषध प्रशासन विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

मध्य प्रदेशातील कफ सिरप प्रकरणानंतर सरकारने दोन दिवसांपूर्वी आदेश जारी करून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कप सिरप विक्रीस बंदी घातली; मात्र या आदेशांची पायमल्ली राज्यभर सुरू आहे. राज्यात सुमारे एक लाख आणि ‘एमएमआर’ परिसरात सुमारे ३० हजार औषध दुकाने आहेत. त्यापैकी जवळपास ९० टक्के दुकाने डॉक्टरांच्या चिट्ठीशिवायच कफ सिरप देत असल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘आमच्या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई आणि उपनगरांसह अनेक ठिकाणी दुकानदार डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधे विकताना आढळून आले. हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही, तर लोकांच्या आरोग्याशी खेळ चालला आहे.’ तज्ज्ञांच्या मते ‘कफ सिरप’सारख्या औषधांचा गैरवापर व्यसनाकडे नेणारा पहिला टप्पा ठरू शकतो. झोप किंवा नशेसाठी या सिरपचा गैरवापर तरुण करतात. त्यामुळे नियमांकडे दुर्लक्ष होत राहिले, तर भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

तोडगा
अनेक औषध दुकानदारांनी यावर तोडगा काढला आहे. कफ सिरप आणि इतर औषधांची विक्री ‘सामान्य औषध’ म्हणून दाखवून ग्राहकांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचे नवे मार्ग त्यांनी शोधले आहेत..


..
लहान मुलांसाठी बनवलेल्या सिरपमध्ये कप रासायनिक मिश्रणाचे प्रमाण चुकल्यास ते घातक ठरू शकते. त्यातच याचा अतिरेक झाल्यास मूत्रपिंड, यकृत आणि मेंदूवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
- डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय

ड्रॉप, सिरप आणि गोळ्या असे औषधाचे तीन प्रकार असतात. त्यानुसार वयोगट व प्रकृती पाहून औषधांची मात्रा किती प्रमाणात असावी, किती दिवस असावी, याचा निर्णय डॉक्टर घेतात. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषध द्यायला नकोत.
- डॉ. राधा घिलडीयाल, बालरोगतज्ज्ञ, विभागप्रमुख, सायन रुग्णालय

अन्न आणि औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी सध्या शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयातील कफ सिरपचे नमुने घेत आहेत. त्यानंतर याची तपासणी करून या मानकापेक्षा जास्त घटकांचे प्रमाण असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आता औषध अधिकारी सक्रिय झाले असून, जास्तीत जास्त नमुने गोळा करण्यावर भर दिला जात आहे.
- दा. रा. गहाणे, सहआयुक्त अन्न आणि औषध प्रशासन

कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने व पालिका प्रशासनाने संयुक्तपणे छापेमारी करण्याची गरज आहे.
- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर्स असोसिएशन
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com