बालगुन्हेगारीच्या घटनांत वाढ
बालगुन्हेगारीच्या घटनांत वाढ
नागपूर, पुण्यापेक्षा मुंबईत प्रमाण कमी
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः अल्पवयीन तरुणांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नोंद झाल्या आहेत. राज्यात घटनांचा आलेख सतत चढा असताना सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत मात्र बालगुन्हेगारीचे प्रमाण नागपूर, पुणे शहरापेक्षा बरेच कमी असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालावरून स्पष्ट होते.
२० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील १९ शहरांमध्ये नोंद गुन्ह्यांचा आढावा विभागाने आपल्या अहवालात घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातील मुंबई (१८४ लाख), नागपूर (२५) आणि पुणे (५५) या शहरांचा समावेश आहे. २०२३ मध्ये या १९ शहरांमध्ये अल्पवयीन तरुणांकडून घडलेल्या ५,८४० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत २९०, नागपूर २५४ आणि पुण्यातील २७५ गुन्ह्यांचा समावेश आहे.
नोंद गुन्ह्यांच्या संख्येनुसार १९ शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर शहर अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी आहे. सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद दिल्ली (२२७८), चेन्नई (५२३), बंगळूर (४२७) आणि अहमदाबाद (४१७) या शहरांमध्ये आहे.
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत ३० टक्के अल्पवयीनांचा समावेश आहे. याच टक्केवारीने मुंबईत ५५, नागपुरात ७.५ आणि पुण्यात १५ लाख अल्पवयीन आहेत, असा अंदाज बांधता येतो. या लोकसंख्येच्या तुलनेत १९ महानगरांमधील बालगुन्हेगारीचे प्रमाण १६ (एक लाख अल्पवयीन तरुणांमागे) इतके भरते. मुंबईत हे प्रमाण पाच, नागपुरात ३४ तर पुण्यात १८ इतके आहे.
शारीरिक गुन्हे
मुंबई - १२०
नागपूर - ९०
पुणे - १२८
एकूण - १६९२
मालमत्तेशी संबंधित गुन्हे
मुंबई - ७९
नागपूर - १३५
पुणे - ९८
एकूण - २६२८
शस्त्र, स्फोटके
मुंबई - ०
नागपूर - १
पुणे - ११
ताब्यात घेतलेले अल्पवयीन आरोपी
मुंबई - ३४२
नागपूर - ३७३
पुणे - ४४३
पालकांसोबत राहणारे बालगुन्हेगार
मुंबई - ३२९
नागपूर - ३६१
पुणे - ४३६
राज्यातील बालगुन्हेगारी
सपूर्ण देशात २०२३ मध्ये २८४५२ गुन्हे घडले होते. त्यातील सर्वाधिक ३९७० गुन्हे महाराष्ट्रात घडले. देशात दर लाख लोकसंख्येमागे सात गुन्हे असे सरासरी प्रमाण आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण ११ इतके आहे.