हवामान बदलाशी लढण्यासाठी महापालिकेची  मोहीम

हवामान बदलाशी लढण्यासाठी महापालिकेची मोहीम

Published on

हवामान बदलाशी लढण्यासाठी महापालिकेची मोहीम
जैवविविधता वाढविण्यासाठी वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईला अधिक हवामान प्रतिरोधक आणि जैवविविधतेने समृद्ध शहर बनवण्याच्या दिशेने महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरी उद्यानांमध्ये जैवविविधता वाढविण्यासाठी वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेने ‘जैवविविधता पुनर्बांधणी’ मोहीम सुरू केली आहे.
उद्यान विभागाच्या या नवीन मोहिमेसाठी विविध ठिकाणी कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे पहिली कार्यशाळा पार पडली. ही कार्यशाळा डब्ल्यूआरआय इंडिया आणि लेडीबर्ड एनव्हायर्नमेंटल कन्सल्टिंग एलएलपी यांच्या सहकार्याने पार पडली.
निसर्ग आणि शहर यांच्यात समतोल साधणे, हा यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यशाळेत महापालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी आणि बागकाम तज्ज्ञांना जैवविविधता वाढवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. शहरी उद्याने, रस्ते, अधिक वाहतुकीच्या विभागामध्ये स्थानिक झाडे, फुले आणि वनस्पती लावून नैसर्गिक परिसंस्था मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
ही मोहीम मुंबई हवामान कृती आराखड्याचा भाग असून, शहराच्या हरित उपक्रमांना वैज्ञानिक आणि निसर्गाला सकारात्मक दिशा देणारी आहे. पुनर्वनीकरणमुळे कीटक, मातीतील सूक्ष्मजीव, फुलपाखरे, मधमाश्या, पक्षी, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे आणि इतर जीवसृष्टी यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. मुंबईच्या सात प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यातील बाग नियोजन, उद्यान व्यवस्थापन आणि स्थानिक प्रजातींचे संवर्धन यातून लोक, निसर्ग आणि हवामान या तिघांचाही समतोल साधण्याचा पालिकेचा या माध्यमातून प्रयत्‍न सुरू आहे.

मुंबईसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात हरित क्षेत्र जपणे अत्यावश्यक आहे. स्थानिक प्रजातींची लागवड केल्यास जैवविविधता वाढते आणि पर्यावरणीय संतुलन राखले जाते. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मुंबईला अधिक हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
- जितेंद्र परदेशी,
उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका

Marathi News Esakal
www.esakal.com