भारत-इंग्लंड सहकार्यामुळे नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल

भारत-इंग्लंड सहकार्यामुळे नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल

Published on

भारत-इंग्लंड सहकार्यामुळे नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल
पंतप्रधानांचे संयुक्त निवेदन

मुंबई, ता. ९ ः भारत आणि इंग्लंड यांच्यात सहकार्याचे नवे पर्व सुरू होत असून त्यामुळे व्यापार, उद्योग, पर्यावरण तसेच देशातील तरुण यांचा मोठा फायदा होईल आणि देशाच्या सर्वच नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासह संयुक्त निवेदनात दिली.
राजभवनात आज त्यांनी स्टार्मर यांच्याशी तसेच इंग्लंडच्या व्यापारी आणि शैक्षणिक शिष्टमंडळाशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील संबंधात उल्लेखनीय प्रगती होत असून सर्वंकष आर्थिक आणि व्यापार करारामुळे (सीटा) दोन्ही देशांतील आयात कर कमी होतील, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, तसेच उद्योग, व्यापार आणि ग्राहकांना लाभ होईल, असेही मोदी यांनी दाखवून दिले. भारत व इंग्लंड हे दोन्ही देश लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य याच्यावर विश्वास ठेवणारे असल्याने ते नैसर्गिक भागीदार आहेत. त्यामुळे आजच्या जागतिक अस्थिरतेच्या युगात या दोन देशांची भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार आहे, असेही मोदी म्हणाले. हिंद-प्रशांत विभागात नाविक सुरक्षा सहकार्य वाढावे, यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असून गाझापट्टीत तसेच युक्रेनमध्ये चर्चेच्या आधारावर शांततेच्या प्रयत्नास दोन्ही देशांचे समर्थन आहे, असेही त्यांनी सांगितले.
इंग्लंडचे उद्योग कौशल्य आणि संशोधन विकास यांना उद्योगातील भारतीय गुणवत्तेशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी आम्ही तयार केलेला भारत युनायटेड किंगडम तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम हा महत्त्वाच्या तंत्रज्ञानासाठीचा संयुक्त संशोधन आणि नवकल्पनांचा मंच आहे. यातून दोन्ही देशांच्या तरुणाईत सेतू बांधला जाईल. विशेष खनिजांसंदर्भातील सहकार्यासाठी इंडस्ट्री गिल्ड आणि पुरवठा साखळी निरीक्षणगृह धनबाद येथे उभारले जाईल. पर्यावरणपूरक विकासासाठी इंडिया यूके सागरी पवन ऊर्जा कृतीदल स्थापन केल्याचेही मोदी यांनी दाखवून दिले.
...
इंग्लंडची विद्यापीठे भारतात
क्लायमेट टेक्नॉलॉजी स्टार्टअप फंडामुळे दोन्ही देशातील पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना पाठबळ मिळेल, तर इंग्लंडची नऊ विद्यापीठे आता भारतात आपली संकुले उभारणार असून गिफ्ट सिटीतही इंग्लंडची तीन विद्यापीठे येत आहेत, असेही मोदी म्हणाले.
...
भारत दौऱ्याची फलनिष्पत्ती
- भारत-ब्रिटन संयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना
- विशेष खनिजांच्या पुरवठा साखळीसाठी क्रिटिकल मिनरल्स इंडस्ट्री गिल्डची स्थापना
- बंगळूरमध्ये लँकेस्टर विद्यापीठाची शाखा उघडणार
- गिफ्ट सिटीमध्ये सरे विद्यापीठाची शाखा उघडणार
- आर्थिक वाढ व रोजगार निर्मितीसाठी भारत-ब्रिटन संयुक्त आर्थिक व्यापार समितीची पुनर्रचना
- हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप निधीमध्ये नवी संयुक्त गुंतवणूक
- आरोग्य संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि ब्रिटन एनआयएचआर यांच्यात करार

Marathi News Esakal
www.esakal.com