भुयारी मेट्रोत प्रवासी ‘नॉट रीचेबल’!

भुयारी मेट्रोत प्रवासी ‘नॉट रीचेबल’!

Published on

भुयारी मेट्रोत प्रवासी ‘नॉट रिचेबल’!
मोबाईलला नेटवर्क नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : आरे-कफ परेड मेट्रो-३ ही भुयारी मेट्रोसेवा सुरू झाल्याने मुंबईकरांना गारेगार आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाची पर्वणी मिळाली आहे, मात्र या तासाभराच्या प्रवासात प्रवासी पुरते नॉट रिचेबल होत आहेत. या भुयारी मेट्रो मार्गिकेवर मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्याने प्रवाशांना स्थानकात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत ना कोणाचा फोन येतो, ना व्हॉट्सॲपवर मेसेज येतो. त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ३३ किलोमीटरच्या भुयारी मार्गात ‘एमएमआरसी’ साधी मोबाईल नेटवर्कची व्यवस्था का करू शकली नाही, असा सवाल प्रवासी करत आहेत.

मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारी (ता. ९) सकाळपासून संपूर्ण मेट्रो मार्गिका प्रवासी सेवेत आली. त्याला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, पहिल्याच दिवशी दीड लाखाहून अधिक या मार्गावरून प्रवास केला. वाहतूक कोंडीमुक्त या प्रवासामुळे एका तासाची बचत होत असल्याने मुंबईकर मेट्रोचे तोंडभरून कौतुक करत आहेत, मात्र नेटवर्क अभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने प्रवाशांनी नाराजीचा सूर आळवला. मुंबईकर अनेकदा कामावर जात असताना प्रवासात मोबाईल, लॅपटॉपवर काम करतात, पण मोबाईलला नेटवर्क येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

प्रवाशांची पायपीट
भुयारी मेट्रोच्या नुकत्याच सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात ११ स्थानके आहेत. त्यापैकी सीएसएमटी, चर्चगेट, हुतात्मा चौक, महालक्ष्मी ही स्थानके वगळता अन्य स्थानकांबाहेर टॅक्सी, बसथांबे नाहीत. त्यामुळे स्थानकाबाहेर पडलेल्या प्रवाशांना कनेक्टिव्हिटीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना पायपीट करत बसथांबा, कार्यालय गाठावे लागत आहे.


मोबाईल हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे मोबाईल नॉट रिचेबल राहणे नोकरदार आणि व्यावसायिकांच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. प्रशासनाने त्याची दखल घेऊन तत्काळ नेटवर्क उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार करावा.
- मोक्ष तौनक, व्यावसायिक

मेट्रो प्रवासात आणि स्थानकात मोबाईलला नेटवर्क नसते. त्यामुळे तत्काळ कोणाला संपर्क करायचा असेल, मेसेज द्यायचा असेल, तर गैरसोय होत आहे. तसेच मेट्रोत अपघात घडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संपर्क कसा साधणार, हा प्रश्न आहे.
- आलम मोहम्मद, व्यावसायिक
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com