ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम

ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम

Published on

ॲप कंपन्यांच्या भाडेवाढीला लगाम
दीड पटीची मर्यादा; माेटर वाहन ॲग्रीगेटर नियमाचा मसुदा जाहीर

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १० ः  राज्य सरकारने ‘मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ जाहीर केले आहे. या धोरणानुसार मागणी वाढल्यास ॲप कंपनीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या मूळ भाड्याच्या १.५ पटीपेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. तसेच  चालक एका दिवशी जास्तीत जास्त १२ तासच ॲपवर लॉग-इन राहू शकणार आहे. त्यानंतर किमान १० तास विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामुळे प्रवाशांसह  चालकांनाही दिलासा मिळणार आहे. शुक्रवार (ता. १७)पर्यंत या मसुद्यावर हरकती व सूचना देता येणार आहेत. 


राज्यातील ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांसाठी (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ याचा मसुद्याची घोषणा केली आहे. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५पर्यंत या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. 
----
नियम कोणाला लागू?
ई-रिक्षांसह सर्व प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरना लागू होतील. ओला-उबरसारख्या कॅब सेवांसोबत ई-रिक्षा सेवाही या चौकटीत येणार आहेत. बाइक टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम, २०२५ लागू राहतील आणि त्यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरण व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण  यांच्याकडून परवाना घेताना शुल्क भरावे लागणार आहे.

परवाना शुल्क किती?
तपशील : राज्य परिवहन प्राधिकरण : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा)
परवाना : १० लाख : २ लाख
परवाना नूतनीकरण : २५ हजार : ५ हजार
-----
वाहनांची संख्या अन्‌ सुरक्षा ठेव
१०० बस किंवा एक हजार वाहने : १० लाख रुपये
एक हजार बस किंवा १० हजार वाहने : २५ लाख रुपये
एक हजारहून अधिक बस किंवा १० हजारहून अधिक वाहने : ५० लाख रुपये
-----
भाड्याचे नियमन
- मागणी वाढल्यास ॲप भाडे वाढवू शकेल; पण ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या मूळ भाड्याच्या १.५ पटीपेक्षा जास्त नसावे.
- मागणी कमी झाल्यासही भाडे मूळ दराच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही.
- रायडरला आकारले जाणारे सुविधा शुल्क मूळ भाड्याच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, तसेच एकूण कपात मूळ भाड्याच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक नसावी.
-----
चालक अन्‌ वाहनांसाठी अटी
- चालक एका दिवशी कमाल १२ तास ॲपवर लॉग-इन राहू शकतो. त्यानंतर किमान १० तासांची विश्रांती घ्यावी लागेल.
-  ॲग्रीगेटरकडे जोडण्यापूर्वी चालकांना ३० तासांचा प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाची शिफारस
- चालकाचे सरासरी रेटिंग दोन स्टारपेक्षा कमी असल्यास त्याला सुधारात्मक प्रशिक्षण घ्यावे लागेल. तोपर्यंत त्याला ॲपवरून काढण्यात येईल.
- प्रवाशांना पाच लाख रुपयांपर्यंतचा प्रवास विमा घेण्याचा पर्याय ॲपमध्ये उपलब्ध असावा.
- ऑटो रिक्षा व मोटारकॅब नोंदणीपासून नऊ वर्षांपेक्षा जास्त जुन्या नसाव्यात, तर बस आठ वर्षांपेक्षा जुनी नसावी.

ॲप आणि वेबसाईटच्या अटी
- ॲप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत उपलब्ध असावे.
- चालकाला राइड स्वीकारण्यापूर्वी प्रवाशाचे गंतव्यस्थान दिसणार नाही, असे ॲप डिझाइन असावे.
- प्रवाशाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग व प्रवास स्थिती पाहण्याची सुविधा ॲपवर असावी.
- दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा  अनिवार्य असतील.
---
महाराष्ट्र सरकारचे ‘मोटर वाहन ॲग्रीगेटर  नियमांमुळे राज्यातील ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये प्रवाशांचा विश्वास, सुरक्षितता आणि सेवा दर्जा वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच चालकांच्या कामकाजासाठी ठोस मर्यादा व कल्याणकारी तरतुदी लागू होणार असल्याने चालकांचाही शोषणापासून बचाव होईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com