विमानतळावर ६१ जिवंत प्राण्यांची सुटका
विमानतळावर ६१ जिवंत प्राण्यांची सुटका
मुंबई विमानतळावर तस्करीचा पर्दाफाश; सीमा शुल्क अधिकाऱ्यांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी (ता. ११) एक धक्कादायक प्रकार उघड झाला. विमानतळावरील सतर्क सीमा शुल्क (कस्टम) अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून ६१ जिवंत प्राणी जप्त केले. या प्राण्यांमध्ये सरीसृप, दुर्मिळ सस्तन प्राणी आणि कीटकांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कस्टम अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशाच्या वागणुकीत आणि कागदपत्रांमध्ये संशयास्पद गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर त्याची तपासणी केली असता, प्रवाशाच्या बॅगेत विशेष पद्धतीने लपवून ठेवलेले जिवंत प्राणी सापडले. अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्व प्राणी ताब्यात घेऊन वन्यजीव तज्ज्ञांच्या ताब्यात दिले.
हे सर्व प्राणी रेसक्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाईफ वेलफेअर या संस्थेकडे पशुवैद्यकीय तपासणी आणि स्थिरीकरणासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. अद्याप सर्व प्रजातींची अधिकृत ओळख पटलेली नसली तरी काही प्राणी वन्यजीव संरक्षण कायदा आणि आंतरराष्ट्रीय करारांतर्गत संरक्षित प्रजातींच्या यादीत असल्याची शक्यता आहे.
या प्रकरणाची माहिती वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोला देण्यात आली आहे. कस्टम विभागाने देश-विदेशातील संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून या तस्करीमागील आंतरराष्ट्रीय टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आले असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, दुर्मिळ पाळीव प्राणी आणि काही प्राण्यांच्या शरीरभागांच्या औषधी उपयोगासाठी वाढती मागणी ही अशा बेकायदा तस्करीला खतपाणी घालत आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवर सीमा शुल्क, पोलिस, वन विभाग आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये अधिक समन्वयाची गरज असल्याचे नमूद केले आहे. तस्करीतून वाचवण्यात आलेल्या प्राण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी रॉ संस्थेने तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की या प्राण्यांवर उपचार सुरू आहेत आणि काही प्राणी अत्यंत थकलेल्या स्थितीत सापडले.
मुंबई विमानतळावर उघड झालेला हा प्रकार पुन्हा एकदा दाखवून देतो, की भारत हा वन्यजीव तस्करीसाठी महत्त्वाचा मार्ग बनत चालला आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक देखरेख, सीमा शुल्क प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमा हाच एकमेव उपाय असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.