
महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार
कामा रुग्णालयातील तीन वरिष्ठ तज्ज्ञांच्या अभ्यासातून उघड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : गर्भाशयमुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग हा भारतातील महिलांसाठी वाढता आरोग्य धोका ठरत आहे. जागतिक स्तरावर महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांपैकी हा चौथ्या क्रमांकावर असून, भारतात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे, मात्र आता या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो, असे राज्य सरकारच्या कामा रुग्णालयातील तीन वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञांच्या नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्स अँड रिसर्च या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
या अभ्यासानुसार, असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणाऱ्या उच्च जोखमीच्या महिलांमध्ये ‘एचपीव्ही’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) आणि ‘एसटीआय’ (लैंगिक संसर्गजन्य आजार) या दोन्ही तपासण्या एकत्र केल्यास गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा संभाव्य धोका सुरुवातीलाच समजून घेता येतो. या तपासण्या महिलांमधील उच्च जोखमीचे संक्रमण ओळखण्यासोबतच या दोन्ही आजारांचा परस्परसंबंध कसा आहे, हे समजण्यास मदत करतात.
या संशोधनात कामा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तुषार पालवे, डॉ. भावना कालवर आणि डॉ. राजश्री चातिकोंडे यांनी सहभाग घेतला. त्यांनी २० ते ६७ वयोगटातील ४० महिलांचा अभ्यास केला. या महिलांना खाज, पांढरा स्त्राव, रक्तस्राव आणि अस्वस्थता अशी लक्षणे होती. सर्व महिलांची एचपीव्ही तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी २६ महिलांची एसटीआय तपासणी करण्यात आली.
४० महिलांपैकी एका महिलेत एचपीव्ही-१८ आणि दोन महिलांमध्ये इतर उच्च जोखमीचे एचपीव्ही प्रकार आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ७.५ टक्के होते. एसटीआय तपासणीत सहभागी झालेल्या २६ महिलांपैकी १३ महिलांमध्ये किमान एक तरी संक्रमण आढळले. आठ महिलांमध्ये युरिआप्लाझ्मा आणि गार्डनरेला हे दोन्ही संक्रमण आढळले, चार महिलांमध्ये फक्त युरिआप्लाझ्मा आणि एका महिलेत ट्रायकोमोनस संक्रमण आढळले. दोन महिलांमध्ये एचपीव्ही आणि एसटीआय हे दोन्ही संक्रमण एकत्र असल्याचे निदर्शनास आले.
संयुक्त तपासणीचे महत्त्व
डॉ. पालवे यांच्या मते, एचपीव्ही हा लैंगिक संपर्कातून पसरणारा सामान्य विषाणू आहे. याचे २०० पेक्षा जास्त प्रकार आहेत, त्यापैकी एचपीव्ही-१६ आणि एचपीव्ही-१८ हे उच्च जोखमीचे प्रकार गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण ठरतात. युरिआप्लाझ्मा आणि गार्डनरेला यांसारखे एसटीआय संसर्ग एचपीव्हीचा परिणाम वाढवतात, ज्यामुळे कर्करोगाची शक्यता दुप्पट होते. त्यामुळे एचपीव्ही आणि एसटीआयची संयुक्त तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अभ्यासाचा निष्कर्ष
अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, काही महिलांमध्ये एचपीव्ही आणि एसटीआय दोन्ही संक्रमण एकत्र आढळतात आणि त्यामुळे गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. या दोन्ही तपासण्यांचा एकत्र वापर केल्यास या कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.