मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला गती
मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाला गती
पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी माती परीक्षण सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३च्या पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रारंभिक कामास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी आवश्यक असलेले माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. गोरेगावातील मोक्याच्या ठिकाणी १४३ एकरांवर पसरलेला हा प्रकल्प मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे.
म्हाडा खासगी विकसकाच्या माध्यमातून बांधकाम आणि विकास (सी अँड डी) या तत्त्वावर हा पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे. पुनर्विकास योजनेनुसार, वसाहतीतील मोकळ्या जागांवर आधी बांधकाम केले जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या बांधकाम आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्याला म्हाडाने मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पाचे तपशील रहिवाशांपुढे मांडले जातील, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. १९६० च्या दशकात विस्थापित प्रकल्पग्रस्तांना घरे देण्यासाठी बांधण्यात आलेल्या मोतीलाल नगर या वसाहतीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्याने व बेसुमार अनधिकृत बांधकामांमुळे वसाहतीची अवस्था गंभीर झाली असून, मूलभूत सोयीसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. २०१३ मध्ये मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने प्रयत्न सुरू केले आणि यावर्षी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन आवश्यक त्या कायदेशीर मान्यतादेखील मिळाल्या आहेत. राज्य सरकारनेही या पुनर्विकास प्रकल्पाला ‘विशेष प्रकल्प’ दर्जा दिला आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना १६०० चौरस फूट बांधकाम क्षेत्राची घरे देण्यात येणार असून, ९८७ चौरस फूट बांधकाम क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहेत. या वसाहतीत ३,३४० निवासी घरे असून, ३२८ व्यावसायिक गाळे आहेत. अदाणी प्रॉपर्टीजने म्हाडाच्या निविदेमध्ये ३६ हजार कोटींची सर्वोच्च बोली लावत हा प्रकल्प मिळवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.