दगडफेकीच्या घटनांची धास्‍ती

दगडफेकीच्या घटनांची धास्‍ती

Published on

दगडफेकीच्या घटनांची धास्‍ती
लोकलनंतर मेल-एक्स्प्रेसही लक्ष्य; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील रेल्वे प्रवास आता धोकादायक बनला आहे. लोकल गाड्यांवर सुरू असलेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर आता मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही दगडफेक केली जात आहे. सोमवारी रात्री अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान दोन गाड्यांवर सलग दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोयना एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी एक्स्प्रेस या गाड्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या वेळी कोणी जखमी झाले नाही, मात्र दगडफेकीचे वाढते सत्र प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आणि सुरक्षेतील ढिलाईचे निदर्शक ठरत आहे.
लोखंडी ग्रील बसवणे, पोलिस गस्त वाढवणे, संवेदनशील भागांत सीसीटीव्ही बसवणे अशा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. दगडफेकीच्या घटना नित्याच्या झाल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. रेल्वेचा प्रवास सुरक्षित आहे का, हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाच्या मनात पुन्हा उभा राहतो आहे.
या तिन्ही घटनांनंतरही रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रत्येक घटनेनंतर केवळ सुरक्षा वाढवली जाईल, अशी घोषणा केली जाते; मात्र त्याचे काहीच फलित दिसत नाही.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कबूल केले, की काही झोपडपट्ट्यांतील मुले आणि किशोरवयीन तरुण दगडफेक हे खेळ किंवा धाडस समजून करतात. परंतु या खेळामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. या वक्तव्यातूनच प्रशासनाचे हात किती बांधले गेले आहेत, हे स्पष्ट होते.

गेल्या काही दिवसांतील वाढत्या घटना
* हार्बर आणि मेन लाइनवर दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत.
* २६ सप्टेंबर : सीएसएमटी-गोरेगाव लोकलमध्ये रे रोडजवळ दगड लागून २८ वर्षीय महिलेला गंभीर दुखापत
* १८ सप्टेंबर : वडाळ्याजवळ ३९ वर्षीय अनुराधा साव यांच्या डोळ्याला दगड लागला.
* १५ सप्टेंबर : कॉटन ग्रीन-रे रोडदरम्यान फूटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या २१ वर्षीय हर्षदा पवार यांच्या चेहऱ्याला दगड लागून जखम
* १३ ऑक्टोबर : अंबरनाथ-बदलापूरदरम्यान धावत्या कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्स्प्रेसवर दगडफेक झाली. यात कोणीही जखमी नाही.

दगडफेक करणारे कोण?
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, बहुतांश प्रकरणांमध्ये दगडफेक करणारे १२ ते १८ वयोगटातील मुले असतात. काही प्रकरणांमध्ये ती व्यसनाधीन किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात. अलीकडेच भेंडी बाजार परिसरातील मोहम्मद अली रोडवरून नौशाद अली अब्दुल वाहिद शेख (वय ३५) या बेघर व्यक्तीस अटक करण्यात आली. त्याने चार वेगवेगळ्या दगडफेकीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे कबूल केले. ही एक घटना असली तरी अशा प्रकारच्या असंख्य प्रकरणांचा तपास अद्याप अंधारात आहे.

प्रयत्न की औपचारिकता?
रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि जीआरपी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण येत नाही. काही ठिकाणी गस्त वाढवली असली तरी ती केवळ कागदोपत्री आहे. काही संवेदनशील ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत आहेत.

अशा घडतात घटना
रेल्वेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे ३० दगडफेकीच्या घटना नोंदवल्या जातात. तर पश्चिम रेल्वेवर १० ते १२ प्रकरणे समोर येतात. मात्र ही फक्त नोंद झालेली प्रकरणे आहेत. प्रत्यक्षात अनेक घटना नोंदवल्याच जात नाहीत. हार्बर लाइनवरील डॉकयार्ड रोड ते मानखुर्ददरम्यान आणि मेन लाइनवरील कळवा, मुंब्रा, दिवा आणि कल्याणच्या पलीकडे अशा घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

प्रवाशांमध्ये वाढती अस्वस्थता
रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. पण आता त्याच प्रवासात जीव धोक्यात घालावा लागतोय. प्रत्येक दगडफेकीनंतर रेल्वे प्रशासन कडक उपाययोजना करण्याची भाषा बोलते, पण ती प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाचा निष्क्रिय दृष्टिकोन संतापजनक आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे, की दगडफेकीच्या कोणत्याही घटनेची माहिती १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर द्यावी. पण अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे, की फोन केला तरी प्रतिसाद मिळत नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com