मुंबईतील देवनार कत्तलखाना होणार आधुनिक

मुंबईतील देवनार कत्तलखाना होणार आधुनिक

Published on

मुंबईतील देवनार कत्तलखाना होणार आधुनिक
महापालिकेचा ३०० कोटींचा पुनर्विकास आराखडा
पोल्ट्रीसाठी स्वतंत्र युनिट, ‘मीट इंडस्ट्री’साठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याची योजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : देशातील सर्वात मोठा आणि ५४ वर्षे जुना देवनार कत्तलखाना आता पूर्णपणे आधुनिक रूपात उभा राहणार आहे. महापालिकेने सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीने हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
१९७१ साली उभारण्यात आलेला देवनार कत्तलखाना सध्या म्हशी, शेळ्या आणि डुकरांच्या प्रक्रिया व कत्तलीसाठी वापरला जातो. मात्र गेल्या काही दशकांतील वापरामुळे त्याच्या इमारतींची आणि यंत्रणांची झीज झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जुने बांधकाम पाडून आधुनिक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानयुक्त कत्तलखाना उभारण्याची योजना आखली आहे. यामध्ये म्हैस, शेळी-मेंढी, डुक्कर तसेच पोल्ट्री (कोंबड्या) यांच्यासाठी स्वतंत्र युनिट उभारले जाणार आहे.
या प्रकल्पाची खासियत म्हणजे कौशल्य विकास केंद्र उभारण्याची योजना. येथे विद्यार्थ्यांसाठी मांस उद्योगाशी संबंधित शैक्षणिक अभ्यासक्रम, उत्पादन विकास आणि संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्रासाठी शासनमान्य संशोधन संस्था आणि शिक्षणसंस्था सहभागी करून घेण्याचा विचार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन प्रकल्पात प्राण्यांसाठी शेड, लोडिंग-अनलोडिंग रॅम्प, वायुवीजन यंत्रणा, सांडपाणी प्रक्रिया आणि स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येतील. विद्यमान कामकाज अडथळ्याशिवाय सुरू ठेवत टप्प्याटप्प्याने बांधकाम होणार आहे.
या प्रकल्पासाठी महापालिकेने नुकतेच अर्ज मागवून प्रक्रिया सुरू केली आहे. पीपीपी मॉडेलनुसार नागरी सुविधा जसे की रस्ते, सांडपाणी व्यवस्था, वीज, पर्जन्यजल निचरा यांसाठी खर्च महापालिका करणार,तर उर्वरित आधुनिकीकरण आणि बांधकामाचे काम खासगी संस्थांकडून गुंतवणुकीद्वारे केले जाणार आहे.
२०२२मध्ये महापालिकेने सुमारे ४०० कोटींच्या पुनर्विकास योजनेला स्थगिती दिली होती. त्या वेळी काही आमदार आणि नगरसेवकांनी निविदा प्रक्रियेत अनियमितता व खर्चवाढीचा आरोप केला होता. आता नव्या प्रस्तावाद्वारे महापालिकेने ही योजना पुनरुज्जीवित करताना अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि झुनोटिक (प्राण्यांमधून पसरणाऱ्या) रोगांच्या प्रतिबंधावर लक्ष केंद्रित केले आहे.
या प्रकल्पाद्वारे महापालिकेचा उद्देश फक्त क्षमता वाढवणे नाही, तर स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित मांस प्रक्रिया केंद्र उभारणे आहे.
हा कत्तलखाना देशातील सर्वात मोठा आणि आधुनिक ‘मॉडेल अबॅटॉयर’ म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

नव्या आराखड्यानुसार...
* म्हैस कत्तलखाना : दररोज १,१०० म्हशींपर्यंत क्षमता (प्रति शिफ्ट ५५० म्हशी)
* शेळी - मेंढी युनिट : दररोज १०,००० प्राण्यांची क्षमता
* डुक्कर युनिट : दररोज ५०० डुकरांची क्षमता
* पोल्ट्री युनिट (नवीन) : तब्बल २.५ लाख पक्ष्यांची दररोज प्रक्रिया करण्याची सुविधा
* देवनारच्या ४४.४५ एकर परिसरात हा संपूर्ण प्रकल्प राबवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com