दिवळीत महापालिकेचा गृहाेत्सव

दिवळीत महापालिकेचा गृहाेत्सव

Published on

दिवाळीत महापालिकेचा गृहाेत्सव

४२६ घरांची लॉटरी; सर्व घटकांसाठी आरक्षण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : ‘म्हाडा’च्या साेडतीनंतर महापालिकेनेही गृहस्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना खूशखबर दिली आहे. ऐन दिवाळीत ४२६ घरांची लाॅटरी जाहीर केली असून, म्हाडाप्रमाणेच सर्व घटकांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. ही योजना विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील विनियम १५ आणि ३३(२०)(ब)नुसार राबवण्यात येणार आहे. दरम्यान, अल्प अन्‌ अत्यल्प गटातील घरांसाठीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ही घरे खरेदी काेण करणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महापालिकेला शहरातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतून चार हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडांवरच्या बांधकामांतून ८०० घरे मिळाली आहेत. यापैकी ४२६ घरांची लॉटरीद्वारे विक्री, तर २१४ घरे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या योजनेस महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही घरे मुंबईतील वीसपेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध असून, त्यात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी वेगवेगळे पर्याय दिले जाणार आहेत. तसेच पत्रकार आणि सैनिकांसाठी प्रत्येकी दाेन टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून लॉटरी प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. अर्जप्रक्रिया १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडेल. २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता साेडत काढण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी संकेतस्थळावर निकाल जाहीर हाेणार आहे. या घरांचे क्षेत्रफळ ३०० चौरस फुटांपेक्षा अधिक असून, संबंधित परिसरातील रेडीरेकनर दरावर १० टक्के अधिभार लावून घरांची किंमत ठरवण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या परिसराचा रेडीरेकनर दर १५ हजार रुपये असेल, तर त्या प्रमाणात क्षेत्रफळ आणि १० टक्के वाढीचा दर धरून अंतिम किंमत निश्चित केली जाईल. या दिवाळीत महापालिकेच्या लॉटरीतून मुंबईकरांना आपले स्वतःचे घर मिळवण्याची मोठी संधी आहे. सर्व घटकांसाठी खुली असलेली ही योजना म्हाडा लॉटरीप्रमाणेच पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
.......
प्रकल्पग्रस्तांसाठी २१४ घरे राखीव
महानगरात विविध प्रकल्पांमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्‍हावे लागले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी महापालिकेने २१४ घरे राखीव ठेवली असून, त्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.
..........
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी सुरुवात : १६ ऑक्टोबर २०२५ सकाळी १० वाजता
- अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम तारीख : १४ नोव्हेंबर २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत.
- पात्र अर्जदारांची अंतिम यादी : १८ नोव्हेंबर २०२५ संध्याकाळी ५ वाजता.
- साेडत : २० नोव्हेंबर २०२५ संध्याकाळी ५ वाजता.
- निकाल जाहीर : २१ नोव्हेंबर २०२५ संध्याकाळी ५ वाजता
........
‘अत्यल्प’च्या घराची
किंमत एक काेटी
महापालिकेच्या अत्यल्प गटातील भायखळा येथील ‘प्रेस्टिज जासदान’ प्रकल्पातील ३०० चाैरस फुटांच्या घराची किंमत एक काेटींपेक्षा जास्त आहे. भांडुप, कांजूरमार्ग, जोगेश्वरी आणि कांदिवली परिसरातील अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती ६४ ते ७० लाखांदरम्यान आहेत. यामुळे ही घरे सर्वसामान्य खरेदी करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
......
प्रकल्पातील घरांच्या किमती (लाख रुपयांत)
स्थळ : किंमत
भांडुप प. : ६३.५०-७०.८५
कांदिवली पू. : ६३.७७-६६.९६
कांदिवली प. : ८१.७९-८२.७३
भायखळा : १०१-१०६
कांजूरमार्ग : ९७.८६-१०७
मरोळ : ७८.५०-९५.४९
मजास : ५४.२७-५७.२९
गोरेगाव प. : ५९.१५
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com