माहिम किल्ल्याला येणार नवी झळाली

माहिम किल्ल्याला येणार नवी झळाली

Published on

माहीम किल्ल्याला येणार नवी झळाळी
आराखड्याचा मार्ग मोकळा; सीमा शुल्क विभागाचे सीमांकन पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. १५ : माहीम किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा एकदा उजळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आराखड्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमा शुल्क विभागाकडून सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुंबई महापालिकेला पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. त्‍यामुळे लवकरच शिवप्रेमी आणि पर्यटकांना माहीम किल्ल्याचे पुरातन वैभव अनुभवता येणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेने मागील वर्षी किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला होता. त्यानंतर किल्ल्याचे जतन, संरक्षण आणि सौंदर्यीकरण या कामावर पालिकेने लक्ष केंद्रित केले. सागरी आरमाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा किल्ला एकेकाळी मुंबईच्या समुद्री संरक्षणाचा शिलेदार मानला जायचा. सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला अनेक युद्धांचा आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. त्याला ग्रेड-१ वारसस्थळ म्हणून मानांकन देण्यात आले आहे, मात्र गेल्या काही दशकांतील अतिक्रमणे, दुर्लक्ष आणि समुद्री लाटांमुळे किल्ल्याची वास्तू जीर्णावस्थेत पोहोचली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने किल्ल्याचे पुनरुज्जीवन आणि पर्यटन विकासासाठी विशेष आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आराखड्यांतर्गत किल्ल्याचे बुरूज, भिंती, प्रवेशद्वार, आणि आतील रचना यांना मूळ स्वरूपात पुनर्स्थापित केले जाणार आहे. या कामासाठी वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्था (व्हीजेटीआय) येथील तज्ज्ञांकडून किल्ल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून, तांत्रिक अहवालानुसार मजबुतीकरण आणि पुनर्बांधणीची कामे केली जाणार आहेत. समुद्री वारे आणि पाण्याच्या झटक्यामुळे निखळलेल्या भागांची दुरुस्तीही केली जाईल. या उपक्रमामुळे मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान पुन्हा उजळण्याची आणि माहीम किल्ला शहरातील एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करारानंतर निविदा प्रक्रिया
पालिका आणि सीमा शुल्क विभाग यांच्यामध्ये औपचारिक करार होणार असून, त्यानंतर कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. दरम्यान, सांस्कृतिक कार्य विभागाकडून या पुनरुज्जीवन आराखड्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com