दसऱ्याच्या मुहूर्तावर महारेराकडून ४०५ नवीन गृह प्रकल्पांची नोंदणी
दसऱ्याच्या मुहूर्तावर महारेराकडून ४०५ नवीन गृह प्रकल्पांची नोंदणी
मुंबईसह एमएमआरमधील १९७ प्रकल्पांचा समावेश; २०९ प्रकल्पांना मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची, घोषित करण्याची स्थावर मालमत्ता क्षेत्रात परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर विकसकांना जास्तीत जास्त नवीन प्रकल्प सुरू करता यावेत, यासाठी महारेरा प्राधिकरणाने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ४०५ नवीन गृह प्रकल्पांना मंजुरी देतानाच नोंदणी क्रमांक जारी केला आहे. यामध्ये मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील १९७ प्रकल्प आहेत. तसेच मुदत संपलेल्या २०९ प्रकल्पांना मुदतवाढ दिली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करता यावेत, यासाठी या प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक, जुन्या प्रकल्पांबाबत विकसकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पातील सुधारणांच्या सुमारे ८०९ प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिलेली आहे. त्यासाठी संबंधित नोंदणी यंत्रणेचे संपूर्ण मनुष्यबळ अहोरात्र कार्यरत होते. दसऱ्याच्या आदल्या दिवशी तर तब्बल २०० प्रकल्पांना प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराकडून नोंदणी क्रमांक देण्यात आले आहेत. या ८०९ प्रकल्पांत नवीन नोंदणी क्रमांकाचे ४०५ प्रकल्प आहेत. २०९ प्रकल्पांचे मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय १९५ प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले होते, ते मंजूर करण्यात आलेले आहेत.
पुण्यात सर्वाधिक प्रकल्प
महारेराकडून नोंदणी क्रमांक मिळालेल्या प्रकल्पांत एकट्या पुण्याचे सर्वाधिक १२२ प्रकल्प आहेत. याशिवाय सातारा सहा , कोल्हापूर आणि सांगलीचे प्रत्येकी चार व सोलापूरच्या तीन प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई महाप्रदेशाचे १८९ प्रकल्प आहेत. यात मुंबई शहर आणि उपनगर मिळून ६३, ठाण्याचे ५८, रायगडचे ४१, पालघरचे २२, रत्नागिरीचे नऊ आणि सिंधुदुर्गचे चार प्रकल्प आहेत.
सहा महिन्यांत ४,९४० प्रकल्पांची नोंदणी
एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत ४,९४० प्रकल्पांचे प्रस्ताव महारेराने मंजूर केले आहेत. यात २,०३९ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोंदणी क्रमांक दिले आहेत. विकसकांनी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा देऊन केलेल्या विनंतीनुसार १७४८ जुन्या प्रकल्पांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, १,१५३ जुन्या प्रकल्पातील सुधारणांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.