बेशिस्त पोलिसांची दिवाळी कडू
बातमी वाचू नये...
बेशिस्त पोलिसांची दिवाळी कडू
आढावा बैठकीत २१ जणांचे निलंबन कायम; वरिष्ठ निरीक्षकांपासून शिपायांचा समावेश
मुंबई, ता. १६ ः गंभीर फौजदारी गुन्हे, लाचखोरी, कर्तव्य कसुरी आणि शिस्तभंग करणाऱ्या २७ पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या निलंबनाबाबत आयुक्त देवेन भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत २१ जणांचे निलंबन कायम ठेवण्यात आले. या अधिकारी, अंमलदारांचे वर्तन गंभीर स्वरूपाचे असल्याचा शेरा मारण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण पोलिस दलावर वचक बसू शकेल, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवली.
भरवस्तीत दिवसाढवळ्या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेण्यापासून सुनियोजित कट रचत खोट्या प्रकरणात एखाद्या व्यक्तीस गोवण्यापर्यंतच्या फौजदारी गुन्ह्यांमध्ये सहभाग स्पष्ट झालेल्या या २७ पोलिसांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय आयुक्तालयाने घेतला होता. या कारवाईचा पुनर्विचार करण्यासाठी १३ ऑक्टोबरला आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत निलंबित पोलिसांच्या कर्तव्य कसुरीचे गांभीर्य, त्याबद्दल नोंद व प्रलंबित फौजदारीपात्र गुन्हे, तपासात हाती आलेले पुरावे, सुरू असलेली शिस्तभंगाची कारवाई याआधारे सर्वांगीण विचार करून टिळकनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक बागुल, आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक महेंद्र सावर्डेकर यांच्यासह २१ जणांचे निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर वरळी पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक रवींद्र काटकर यांच्यासह सशस्त्र पोलिस दलातील अन्य पाच शिपायांचे निलंबन रद्द करण्यात आले. या सहा जणांना पोलिस सेवेत घेण्यात आले असले तरी नेमणुकीबाबत पुढील आदेश येईपर्यंत त्यांना सशस्त्र पोलिस दलात नियुक्त करण्यात आले आहे.
निलंबित पोलिसांचे प्रताप
४०० कोटींच्या भूखंडासाठी बनाव
- गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात खार पोलिस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षात (एटीसी) नियुक्त उपनिरीक्षक विश्वनाथ आंबोळे, शिपाई इम्रान शेख, सागर कांबळे आणि योगेंद्र शिंदे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या चौघांनी कलिना येथे दोन एकरात तबेला चालविणाऱ्या शहाबाज खान यांच्या मित्राला अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपात ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. प्रत्यक्षात तबेल्यातील सीसीटीव्ही चित्रणात हे पोलिस या व्यक्तीच्या खिशात अमली पदार्थांची पुडी ठेवताना कैद झाले. या चित्रणाबाबत माहिती मिळताच चौघांनी खान यांना ते व्हायरल न करण्यासाठी, तक्रार न करण्यासाठी २० लाख रुपये देऊ केल्याचा आरोप आहे, मात्र ते चित्रण व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. हा दोन एकरांचा भूखंड बळकावण्यासाठी स्थानिक राजकारणी, बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांना हाताशी धरत हे षड्यंत्र रचल्याचा आरोप खान करत आहेत.
लाचखोरी
- टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक असताना गेल्या वर्षी जुलै महिन्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीकडे पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात दीपक बागुल यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक झाली होती.
- आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महेंद्र सवर्डेकर यांना तमिळनाडूच्या व्यावसायिकाकडून दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक झाली. तक्रारदाराने ब्लिस कन्सल्टन्सी कंपनीत ४९.४४ लाख गुंतवले होते. त्यात त्याची फसवणूक झाली. या प्रकरणात साक्ष नोंदवण्यासाठी सावर्डेकर यांनी १० टक्के अर्थात ४.९० लाखांची लाच मागितली होती.
अधिकाराचा गैरवापर
वांद्रे येथील दोन व्यक्तींमध्ये आर्थिक वाद होता. त्यातील एकाने वैयक्तिक फायद्यासाठी खेरवाडी पोलिस ठाण्यात नियुक्त सहाय्यक निरीक्षक जाधव, शिपाई करमचंद दुबे आणि विशाल जाधव या तिघांना हाताशी घेतले. या तिघांनी पद आणि अधिकाराचा दुरुपयोग करून विरोधी व्यक्तीवर दबाव आणला. जुलै महिन्यात या व्यक्तीने वरिष्ठांकडे तक्रार करताच हा प्रकार उघडकीस आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.