मिठी नदीवर नवीन पूल

मिठी नदीवर नवीन पूल

Published on

मिठी नदीवर नवीन पूल

धारावी-बीकेसी वाहतूक होणार वेगवान

सकल वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिकेच्या वांद्रे आणि सांताक्रूझ विभागातील ‘ड्राइव्ह इन थिएटर’जवळील धारावी परिसरातील मिठी नदीवरील जुना पूल लवकरच नवीन रूपात दिसणार आहे. वाढत्या वाहतुकीचा ताण, पूरस्थितीच्या काळात होणारी अडचण आणि सुरक्षिततेचे प्रश्न लक्षात घेता या पुलाचे रुंदीकरण आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी ‘डिझाइन अँड बिल्ड’ पद्धतीने प्रकल्प योजना मंजूर करण्यात आली आहे.

महापालिकेच्या पूल विभागाने यासंदर्भात सविस्तर आराखडा तयार केला आहे. या कामाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या जुलै २०२५मधील निर्देशांनुसार करण्यात आला आहे. पुलाचे विद्यमान रुंदीकरण वाढवून अधिक वाहतूकक्षम, पाणी निचरा क्षमता आणि संरचनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत बांधकाम करण्यात येणार आहे.

ड्राइव्ह इन थिएटर परिसरात काही वर्षांत वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. धारावी, सायन, कुर्ला, कलिना आणि बीकेसी या परिसरांना जोडणारा हा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज हजारो वाहने या मार्गाने जातात. पावसाळ्यात मिठी नदीला पूर आल्यास वाहतूक ठप्प होते आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पूल रुंदीकरण आणि पुनर्बांधणीचे काम केल्याने वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहील तसेच आपत्कालीन सेवांनाही सहज मार्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकल्पासाठी ‘डिझाइन अँड बिल्ड’ पद्धती अवलंबली जाणार आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या ठेकेदार कंपनीला डिझाइन तयार करणे आणि बांधकाम दोन्ही जबाबदाऱ्या देण्यात येतील. या पद्धतीमुळे वेळ वाचेल आणि प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. हा पूल फक्त वाहतुकीचा मार्ग नाही, तर मिठी नदीकाठच्या जलप्रवाहावरही परिणाम करतो. त्यामुळे या प्रकल्पात संरचनात्मक मजबुतीसोबत नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर अडथळा येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे महापालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) विभागाने सांगितले.

-----
कामासाठी दाेन वर्षांची मुदत?
पुलाच्या कामासाठी तांत्रिक निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला गती दिली जाणार आहे. पूल बांधकामासाठी उच्च दर्जाच्या काँक्रीटचा वापर, अँटी-कोरोसिव्ह साहित्य आणि अत्याधुनिक पाणी निचरा व्यवस्था बसवली जाणार आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक खर्च अंदाजे कोट्यवधींच्या घरात असून, काम पूर्ण होण्याची मुदत सुमारे १८ ते २४ महिने ठेवली आहे, असे
महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
-------------------
या रस्त्यांवरील भार हलका?
मिठी नदीवरील पूल मजबूत आणि रुंद झाल्यास केवळ वाहतूकच सुरळीत हाेणार नाही, तर पूरस्थितीत नदीचा प्रवाह सुरळीत हाेण्यास मदत हाेणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व उपनगरांतील मुख्य रस्ते, सायन-धारावी रोड, बीकेसी लिंक रोड आणि एलबीएस मार्गावरील वाहतुकीचा भार काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com