दिवाळी सुट्टीमुळे मुंबईसह राज्याची विजेची मागणी घसरली
दिवाळी सुट्टीमुळे मुंबईसह राज्याची विजेची मागणी घसरली
काॅर्पोरेट कार्यालये, उद्योग बंद असल्याचा परिणाम; सुमारे तीन-चार हजार मेगावॉटची घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : प्रकाशाचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीतही मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विजेच्या मागणीत मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर पुढे मंगळवारपासून पुढे दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे अनेकांनी सोमवारची एका दिवसाची सुट्टी टाकली आहे. त्यामुळे सरकारी, कॉर्पोरेट कार्यालयाबरोबरच उद्योगधंदेही बंदच आहेत. त्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीत तब्बल ८००-१,००० मेगावॉटची तर राज्याच्या मागणीत दोन-अडीच हजार मेगावॉटची घट झाल्याचे चित्र आहे. पुढील चार दिवस ही परिस्थिती असणार आहे.
मुंबईसह राज्यभरात सुमारे तीन कोटी वीजग्राहक असून, पाऊस थांबल्याने त्यांच्याकडून दररोज सुमारे २५-२६ हजार मेगावॉट विजेची मागणी नोंदली जात आहे. त्यामध्ये मुंबईची सुमारे ३,८०० मेगावॉट तर मुंबई वगळता संपूर्ण राज्याची २२-२३ हजार मेगावॉट एवढी मागणी नोंदली जाते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण, टाटा पॉवर, बेस्ट आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून पुरेसा वीजपुरवठा केला जात आहे. दरम्यान, शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सर्वसाधारण दिवसाच्या तुलनेत मुंबईत ५०० मेगावॉटपर्यंत विजेच्या मागणीत घट होते, तर राज्यात एक-दीड हजाराची घट नोंदली जातो. मात्र सध्या दिवाळी सुट्टी लागून आल्याने अनेकांनी सलग सुट्ट्या टाकून घर गाठले आहे. त्यामुळे छोटेमोठे व्यवसाय, कॉर्पोरेट कार्यालये बंद असल्याने तेथील वातानुकूलित यंत्रणा, मशनरीसाठी लागणारी वीज कमी झाली आहे. त्याचा परिणाम थेट विजेच्या मागणीवर झाला असून, दिवाळी संपेपर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वीज क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
वीज केंद्रांना विश्रांती
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विजेच्या मागणीत मोठी घट नोंदली आहे. त्यामुळे औष्णिक वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती कमी करण्यात आली आहे. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांची क्षमता १० हजार मेगावॉटहून अधिक असूनही पाच हजार मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती कमी करण्यात आली होती. तसेच इतर खासगी प्रकल्पांत हीच परिस्थिती आहे. त्यामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना काहीशी विश्रांती मिळाली आहे.
दिवाळीच्या सलग सुट्ट्या आल्याने बहुतांश कार्यालये, उद्योग बंद आहेत. अनेकांनी दिवाळीनिमित्त गाव गाठले आहे. त्यामुळे एसीचा वापर कमी झाला असल्याने विजेची मागणी घटली असून, पुढील चार दिवस हीच परिस्थिती असणार आहे.
- अनिल गचके, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कौन्सिल
विजेची किमान मागणी
रविवार
मुंबई - २,८०० मेगावॉट
महाराष्ट्र - २०,००० मेगावॉट
शनिवार
मुंबई - २,८५० मेगावॉट
महाराष्ट्र - २०,५०० मेगावॉट
वीज ग्राहक
बेस्ट - १२ लाख
टाटा पॉवर - ८ लाख
अदाणी इलेक्ट्रिसिटी - २८ लाख
महावितरण - २.५ कोटींहून अधिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.